लोकसहभागाचा अस्सल नमुना अकोलाबाजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2018 11:48 PM2018-02-18T23:48:18+5:302018-02-18T23:48:36+5:30

लोकसहभागातून गावाचे कसे रूप पालटू शकते, याचा आदर्श अकोलाबाजारने घालून दिला. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून गावाचे आरोग्य जपणाऱ्या अकोलाबाजार येथील सरपंच अर्चना प्रवीण मोगरे यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल......

The real prototype of people's participation is Akola market | लोकसहभागाचा अस्सल नमुना अकोलाबाजार

लोकसहभागाचा अस्सल नमुना अकोलाबाजार

Next
ठळक मुद्देसर्वांगिण विकास : रुग्णसेवेतून गावाच्या आरोग्याची राखली निगा

हमीदखाँ पठाण ।
ऑनलाईन लोकमत
अकोलाबाजार : लोकसहभागातून गावाचे कसे रूप पालटू शकते, याचा आदर्श अकोलाबाजारने घालून दिला. रुग्णसेवा हीच खरी ईश्वर सेवा समजून गावाचे आरोग्य जपणाऱ्या अकोलाबाजार येथील सरपंच अर्चना प्रवीण मोगरे यांच्या लोकाभिमुख कार्याची दखल घेऊन त्यांना नुकतेच ‘लोकमत’ सरपंच अवार्डने सन्मानित करण्यात आले.
यवतमाळ तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या चार हजार लोकवस्तीच्या सरपंच पदाची धुरा हाती घेतल्यानंतर गावाचा सर्वांगिण विकास झपाट्याने करण्याचा ध्यास अर्चनाताई मोगरे यांनी घेतला. त्यांची कार्य करण्याची लकब बघून संपूर्ण गाव आपले राजकीय हेवेदावे विसरून त्यांच्या पाठीशी उभे राहिले. गावात सर्व जाती, पंथाचे लोक गुण्यागोविंदाने राहून एकमेकांच्या सुख-दु:खात, सण- उत्सवात सहभागी होतात. आपले राजकीय मुखवटे बाजूला सारून गावाच्या विकासाकरिता एकत्र येतात, हीच या गावाची विशेष ओळख.
गावातील नागरिकांचे आरोग्य उत्तम राहिले, तर गाव सुखी बनते, हे समजून अर्चनाताईनी संपूर्ण लक्ष आरोग्य यंत्रणेवर केंद्रीत केले. बारावीपर्यंत शिक्षण झालेल्या अर्चनाताई यांना शालेय जीवनापासून सामाजिक कार्याची आवड आहे. त्यांना त्यांचे पती प्रवीण मोगरे यांच्या सामाजिक कार्याची जोड मिळाली. बेटी बचाव, सिकलसेल, क्षयरोग, एड्स आदींवर गावात रॅली काढून त्या जनजागृती करण्यात पुढाकार घेतात. किशोरवयीन मुलींची हिमोग्लोबीन तपासणी, मुलींकरिता शाळेत सॅनेटरी नॅपकीनची सोय, मच्छरदाणी वाटप आदी प्रसंगी स्वत: हजर राहतात. रुग्णांच्या सेवेकरिता वारंवार प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क करणे, रुग्णांची विचारपूस करणे, औषधी वाटप, त्यांच्या जेवणाची व्यवस्था करणे, हा त्यांचा नित्याचा उपक्रम आहे. अकोलाबाजारची खासदार भावनाताई गवळी यांनी सांसद आदर्श ग्रामसाठी निवड करून पालकत्व स्वीकारले. पालकमंत्री मदन येरावार, जिल्हा परिषद सदस्य रेणूताई शिंदे, पंचायत समिती उपसभापती गजानन पाटील यांचाही या गावाच्या विकासाकरिता हातभार लागतो.
आता गावाची पाणी फाऊंडेशन अंतर्गत सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरिता निवड झाली. लोकसहभागातून ही स्पर्धा जिंकण्याचा सरपंच अर्चनाताई मोगरे यांचा मानस आहे. त्यांना ग्रामविकास अधिकारी बी.ए. शिंदे, उपसरपंच दयाशंकर अवथरे, ग्रामपंचायत सदस्य योगेश राजूरकर, शंकर छापेकर, संतोष अग्रवाल, रामभाऊ कपाट, उषा भेंडे, ज्योती शेंदरे, कुसूम गोहणे, रंजना नेवारे, सुनंदा वाघाडे, तहसीलदार सचिन शेजाळ, गटविकास अधिकारी सुभाष मानकर आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आहे.
लग्नाकरिता पालकांना आर्थिक मदत
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वयंपाकासाठी किचन शेड प्रस्तावित आहे. गावातील हातपंपाची वारंवार चाचणी करून त्यामध्ये ब्लिचिंग पावडर टाकले जाते. साथरोगाच्या नियंत्रणाकरिता दरमहा फॉगिंग मशीनद्वारे फवारणी केली जाते. गाव शंभर टक्के हागणदारीमुक्तीच्या वाटेवर आहे. गावात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, वॉटर एटीएम मशीन, लघु नळयोजना, हातपंप, नालीतून वाहून जाणारे पाणी अडवून शोषखड्डे निर्माण करण्यात येत आहे. जनावरांकरिता पाण्याचे हौद, नवीन ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम, विहिरीतील गाळ उपसा, लोकसहभागातून शाळा दुरुस्ती, अंगणवाडी दुरुस्ती, डीजिटल शाळा, बालपंगत, अंगणवाडीतील चिमुकल्यांना गणवेश, बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत, पावसाचे पाणी वाहून जाण्याकरिता जेसीबीद्वारे नाली, गावात अंतर्गत पाच किलोमीटर सिमेंट रस्ते, नवीन विद्युत रोहीत्र व आणखी चार विद्युत रोहीत्र, ३४ विद्युत पोल प्रस्तावित करून विजेचा प्रश्न सोडविला. गरिबांच्या मुला-मुलींच्या लग्नाकरिता आर्थिक मदत दिली जाते.

Web Title: The real prototype of people's participation is Akola market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.