युतीतील बंडखोरी काँग्रेसच्या पथ्यावर
By admin | Published: June 11, 2014 12:17 AM2014-06-11T00:17:03+5:302014-06-11T00:17:03+5:30
अनुसूचित जातीसाठी आरक्षित उमरखेड विधानसभा मतदारसंघात चेंजची मागणी होत आहे. मुळात काँग्रेसच्या आमदाराबाबत पक्षातच नाराजी आहे.
राजेश निस्ताने - यवतमाळ
अनुसूचित जातीसाठी आरक्षित उमरखेड विधानसभा मतदारसंघात चेंजची मागणी होत आहे. मुळात काँग्रेसच्या आमदाराबाबत पक्षातच नाराजी आहे.
आमदार विजय खडसे यांनी गेल्या पाच वर्षात उपजिल्हा रुग्णालय आणि बायपासचा प्रश्नही मार्गी न लावल्याने नाराजी आहे. लोकसभा निवडणुकीत राजीव सातव यांना दीड हजार मतांचा आधार दिल्याने खडसे तिकीटाबाबत बिनधास्त आहेत. खडसे यांना पुन्हा संधी दिली गेल्यास पक्षातील कार्यकर्ते त्यांच्या विरोधात भूमिका घेऊ शकतात. भाजपाचे राजेंद्र नजरधने गेल्या वेळी सात हजार २५५ मतांनी पराभूत झाले. गतवेळी भाजपाचे गंगाखेड येथील माजी आमदार विठ्ठलराव गायकवाड यांनी बंडखोरी केली. त्यांना सेनेच्या पाठबळावर नऊ हजार ६८९ मते मिळाली. ही बंडखोरी नजरधनेंच्या पराभवाला कारणीभूत ठरली. या पराभवानंतरही नजरधने मतदारांच्या संपर्कात होते. त्यामुळे आमदार खडसे यांना आतापासूनच हूरहूर लागली आहे. महायुतीत उमरखेड मतदारसंघ रिपाइं (आठवले) गटाच्या वाट्याला सुटावा यासाठी काँग्रेसच्या गोटातून नगरमार्गे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी दिग्रसच्या कंत्राटदाराला तयार केले जात आहे. महायुतीतून बंडखोरी झाली तरच यावेळी काँग्रेसला विजय शक्य आहे. अन्यथा विद्यमान आमदाराला मतदार व पक्षातील नाराजीचा सामना करावा लागणार आहे. काँग्रेस आणि भाजपाकडून उमेदवारीसाठी अनेक नावे चर्चेत आहेत. मनसे, कम्युनिस्टाकडूनही उमेदवार रिंगणात उतरविला जाणार आहे. भाजपा-राष्ट्रवादी-भाजपा असा प्रवास करून आलेले डॉ. विश्वनाथ विणकरे यावेळी राष्ट्रवादीतील गोतावळ्याच्या भरोश्यावर भाजपात बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठीही त्यांनी प्रयत्न चालविले आहे. परंतु नितीन गडकरींशी नजरधनेंची असलेली जवळीक लक्षात घेता विणकरेंची तिकिटासाठी कसोटी लागणार आहे. बिजोरा येथील मालमत्तेच्या संरक्षणासाठी भाजपामधील श्रेष्ठींना हा मतदारसंघ आपल्या ताब्यात हवा आहे. नजरधने त्या श्रेष्ठींचे निकटवर्तीय मानले जात आहे. त्यामुळेच गेल्या वेळी पराभूत होऊनही पुन्हा त्यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. तरीही भाजपातील नवे चेहरे उमेदवारीसाठी प्रयत्न करून नजरधनेंपुढे आव्हान उभे करीत आहे. विजय खडसे यांनी उमरखेड शहराला निधी दिला नाही म्हणून शहरी मतदार आणि नगरपरिषदेचा त्यांच्यावर रोष आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी पाच कोटी देण्याची अर्थ राज्यमंत्र्यांची घोषणा सध्या तरी हवेतील गोळीबार ठरल्याचे दिसत आहे. गेल्या दोन तीन वर्षात दाखल झालेल्या ६० अॅट्रॉसिटी हे खडसेंवरील नाराजीचे मूळ कारण ठरले आहे. त्यातच पक्षातील ज्येष्ठ सदस्यांना खडसे क्षुल्लक कामासाठीही ‘मुलाला भेटा’ असा सल्ला देत असल्याने पक्षातच खडसे विरोधी वातावरण पहायला मिळत आहे. ४० टक्के आमदार विकास निधी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या शिफारसीने खर्च होईल, असे ठरले होते. मात्र खडसेंनी हा शब्द न पाळल्याने राष्ट्रवादी नाराज आहे. त्यातच खडसेंनी गेल्या काही वर्षात सातत्याने मुंबईची वाट धरल्याने स्थानिक कार्यकर्त्यांशी त्यांची असलेली नाळ तुटली आहे.