वणीत पुन्हा शस्त्रसाठा जप्त
By admin | Published: March 28, 2016 02:16 AM2016-03-28T02:16:39+5:302016-03-28T02:16:39+5:30
आठवडाभरापूर्वी अग्निशस्त्रासह अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून वणी पोलिसांनी शनिवारी रात्री
वणी : आठवडाभरापूर्वी अग्निशस्त्रासह अटक करण्यात आलेल्या आरोपींनी दिलेल्या माहितीवरून वणी पोलिसांनी शनिवारी रात्री पुन्हा शस्त्रसाठा जप्त केला. भद्रावतीच्या नगरसेवकासह तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याजवळून तीन पिस्तूल, दोन एक्सट्रा मॅग्झीन आणि चार जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहे.
संजय रामआशिष सिंग रा. राजूर कॉलरी, नगरसेवक प्रमोद परशराम नेवासे रा. भद्रावती आणि अशोक चारुदत्त देठे रा. कुंभारखणी यांना पोलिसांनी शनिवारी रात्री अटक केली. या तिघांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. गत २० मार्च रोजी वणी पोलिसांनी एका वाहनाची झडती घेतली. त्यावेळी जतिंदरसिंग ऊर्फ कालू सज्जन सिंग, गॅरीआॅगस्टीन जोसेफ दोघे रा. भालर वसाहत, विजयसिंह नंदकिशोर सिंग रा. बोधेनगर चिखलगाव यांच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तपासणी केली असता जतिंदरसिंगजवळ देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, सहा राऊंड क्षमतेचे सिलिंडर आणि वाहनात दोन धारदार तलवारी आढळल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घराची झडती घेतली असता देशी बनावटीचे रिव्हॉल्व्हर, एके-४७ रायफलचे १३ जिवंत काडतूस, दोन हत्तीमार राऊंड, एक खाली केस, चार धारदार तलवारी आढळून आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना अटक करून कोठडी घेतली.
चौकशीत त्यांनी अग्नीशस्त्रे भद्रावती येथील नगरसेवक प्रमोद नेवासे, संजय सिंग, अशोक देठे यांना विकल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी शनिवारी या तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील अवैध हत्यारे जप्त केली.
तसेच या तिघांनाही अटक करून न्यायालयासमोर हजर केले. त्यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
आरोपींनी हत्यारे जवळ का बाळगली, त्यांचा काय हेतू होता तसेच आणखी कुणाला घातक हत्यारे अवैधपणे पुरविली का याचा शोध पोलीस घेत आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव गिरी, वणीचे ठाणेदार मुकुंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सुदर्शन वानोळे, सै.साजीद, सुनील खंडागळे, रुपेश पाली, सुधीर पांडे, शे. नसीब, रत्नपाल मोहाडे, प्रकाश बोर्लेवार यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)