मुधापूर रस्त्याअभावी हाल
By admin | Published: May 24, 2017 12:34 AM2017-05-24T00:34:43+5:302017-05-24T00:34:43+5:30
तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आणि वर्धा नदीच्या तिरावर वसलेल्या मुधापूर व पार्डी या दोन गावादरम्यान पक्का डांबरी रस्ता नसल्याने
डांबरी रस्ताच नाही : राळेगाव तालुक्याच्या शेवटच्या टोकावरील गाव
लोकमत न्यूज नेटवर्क
राळेगाव : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आणि वर्धा नदीच्या तिरावर वसलेल्या मुधापूर व पार्डी या दोन गावादरम्यान पक्का डांबरी रस्ता नसल्याने या गावाच्या नागरिकांना अतोनात हाल सहन कारवे लागत आहे. पावसाळ्यापूर्वी येथे पक्का रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
आगामी काळात शाळा-महाविद्यालय सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता, गावकऱ्यांना विविध ठिकाणी जाण्याकरिता सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी आहे. शेतकऱ्यांना खतासह विविध शेती साहित्य गावात आणणे, शेतमाल विक्रीस नेणे, आजारी व्यक्तीला रुग्णालयात नेणे आदीसाठी रस्त्याअभावी त्यांचे अतोनात हाल होत आहे.
पूल ठरणार निरूपयोगी
येवती ते पोहणा पार्डी या दरम्यान असलेल्या जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील एक-दोन किलोमीटर रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात आलेले नसल्याने या मार्गावर बांधण्यात आलेल्या आठ कोटी रुपयांच्या आंतरजिल्हा रस्ता पावसाळ्यात निरूपयोगी ठरण्याची भीती आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने हा पूल व त्यास जोडणाऱ्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण केले होते. वर्षानुवर्षे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून त्यांच्या अखत्यारितील रस्ता पूर्णत्वास जाण्यास प्रयत्न नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यात दुचाकी, चारचाकी वाहने चिखलात फसतात, रस्त्यावरून खाली उतरतात, घसरतात.
पांदण रस्त्याअभावी शेती पडित
यवतमाळ : शेतात जाणारा पांदण रस्ता पूर्णत: उखडल्याने शेतात मशागतीसाठी जाणे शक्य होत नसल्याने झरी तालुक्यातील अहेरअल्ली आणि देमाडदेवी येथील शेती पडित ठेवण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढवली. या दोन्ही गावातील ग्रामस्थांनी वारंवार निवेदन देऊनही प्रशासन दखल घेत असल्याने आता गुराढोरांसह आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. अहेरअल्ली आणि देमाडदेवी येथील पांदण रस्त्याने काम २००८ मध्ये करण्यात आले. ते अतिशय निकृष्ट झाल्यामुळे काही वर्षात हा रस्ता पूर्णपणे उखडला. त्यामुळे या रस्त्यावरून बैलबंडी नेणेही कठीण झाले. या शिवारातील शेताच्या मशागतीचे काम पूर्ण झालेले नाही. पावसाळा तोंडावर असताना रस्त्याअभावी शेतीची कामे खोळंबली आहे. ही समस्या घेऊन दोन्ही गावातील ग्रामस्थांनी झरी तहसील कार्यालयाचे उंबरठे झीजवले. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. एवढेच नव्हे तर स्थानिक लोकप्रतिनिधींनीसुद्धा दखल घेतली नाही. शेवटी त्रस्त ग्रामस्थांनी आता आंदोलनाचा प्रवित्रा घेतला. प्रशासनाने सात दिवसांच्या आत कोणतीच कारवाई न केल्यास राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवर गुराढोरांसह संपूर्ण ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला. याबाबतचे निवेदन झरी तहसीलदारांना देताना सरपंच इंदिरा राऊत, उपसरपंच अनिल राऊत, माणिक शेंद्रे, दादाराव राऊत, हितेश राऊत, राजेश्वर राऊत, भिवाजी सिडाम, संतोष जगनाडे, गंगाधर राऊत आदी उपस्थित होते.