पोलीस मुख्यालयात पाण्यासाठी हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 10:44 PM2018-05-04T22:44:04+5:302018-05-04T22:44:12+5:30
पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे.
रुपेश उत्तरवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पाण्याच्या भीषण टंचाईने सारेच वैतागले आहेत. शासकीय वसाहतीमधील कुटुंबांचेही पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत. पोलीस मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना तर टंचाईची मोठी झळ बसली आहे. दिवसभर कर्तव्य बजावल्यानंतर पोलिसांना रात्री मुलाबाळांसह पाण्यासाठी जाण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे, याची वाच्यताही कोणाकडे करता येत नाही. केली तर कारवाईची भीती आहे. यामुळे मुख्यालयातील सारेच कुटुंब पेचात सापडले आहेत.
तहसील कार्यालयालगत असलेल्या पोलीस मुख्यालयात शेकडो कुटुंब राहतात. या कुटुंबांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सर्वाधिक गंभीर आहे. मात्र हा प्रश्न सोडविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही.
पोलीस मुख्यालयात पाणी वितरण करण्यासाठी स्वतंत्र टँकर आहे. मात्र हे टँकर आठ दिवसांत एकदाच आणि एकच फेरी मारते. या फेरीत एक ड्रमभर पाणी मिळते. इतके पाणी आठ दिवस कसे पुरवावे, हा प्रश्न येथील रहिवाशांना पडलेला आहे. या ठिकाणी जीवन प्राधिकरणाचा नळ आहे. २० ते २५ दिवसानंतर नळ येत आहेत. त्यातही तासभराच्या वर पाणी मिळत नाही. या पाण्यावर काहीच भागत नाही. मुख्यालयाच्या परिसरात दोन हापशाही आहेत. पण त्या बंद पडल्या आहेत. यामुळे पोलीस मुख्यालयाबाहेर असलेल्या शिवमंदिराजवळील हापशीवरूनच पाणी भरावे लागत आहे. या ठिकाणी मोठी गर्दी असते. रात्रीला तासन्तास थांबल्यानंतरच पिण्याचे पाणी अन् वापराचे पाणी भरल्या जाते. या भागात ‘स्ट्रिट लाईट’ नाही. यामुळे रात्री अंधारात पाणी आणावे लागते.
दिवसा कर्तव्य बजावल्यानंतर रात्री पाणी भरण्याची वेळ पोलिसांवर आली आहे. यामुळे पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीयांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. मात्र पर्याय नाही. म्हणून सारेच निमूटपणे सहन करीत आहेत.
टंचाईतही वर्दीचा रूबाब
घरचे सगळे कपडे बाजूला ठेवून आधी वर्दी धुवावी लागते. अनेक गृहिणी तर त्यासाठीच पाणी वाचवून ठेवतात. मोजकेच कपडे धुवून पाण्याची बचत केली जाते आणि वर्दी मात्र स्वच्छ ठेवली जाते. टंचाईतही पोलीस कुटुंबीय वर्दीचा रूबाब राखतात, हे येथे दिसून आले.
पाण्याला दुर्गंध, अंगाला खाज
अनेक वेळा वितरित होणाऱ्या पाण्याला वास येतो. यातून अंगाला खाज सुटण्यासारखे प्रकारही घडत आहेत. यामुळे पाणी उकळून पिले जाते. पाण्याचे बॅरल आणावे लागतात. अन्यथा जीवन प्राधिकरणाच्या टाकीवरून पाणी आणावे लागते. त्याकरिताही लांबच लांब रांगा असतात. हातरिक्षा, आॅटोरिक्षावरून पाणी आणले जात आहे.
मुलभूत सुविधांचा अभाव
या ठिकाणी स्वच्छता, नाल्यांची साफसफाई, स्ट्रिट लाईट, शुद्ध पाण्याची व्यवस्था या सुविधांचा अभाव दिसून येतो. मात्र त्याची वरिष्ठांकडे तक्रार करण्यासाठी कोणीही पुढे येत नाही.
पाहुण्यांना बंदी
पोलीस मुख्यालयात पाण्याची भीषण स्थिती आहे. यामुळे येथील नागरिकांनी पाहुण्यांना न येण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनेक कुटुंब पाण्यासाठी बाहेरगावी जाण्याच्याही तयारीत आहे.