शासकीय कार्यालयात दलालांचा सुळसुळाट
By admin | Published: January 12, 2016 02:16 AM2016-01-12T02:16:11+5:302016-01-12T02:16:11+5:30
शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला लुटणारी टोळीच शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत दिसून येते.
सामान्यांची लूट : अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नेमले एजंट
उमरखेड : शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी येणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेला लुटणारी टोळीच शहरातील विविध शासकीय कार्यालयात कार्यरत दिसून येते. सरळ अधिकाऱ्यांकडे गेल्यास कामच होत नाही, तर दलालांच्या माध्यमातून काही तासातच काम होवून जाते. यामुळे अनेकजण दलालाच आधार घेत आहे, तर दुसरीकडे काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एजंट नेमल्याची माहिती आहे.
घरकूल योजना, शिधापत्रिका, विधवा पेन्शन योजना, अपंग वेतन, कृषी विभाग, तहसील कार्यालय आदींमध्ये विविध कामांसाठी ग्रामीण भागातील नागरिक येतात. मात्र या ठिकाणी येणाऱ्यांना योजनेचा लाभ कसा घ्यावी, याची माहितीच नसते. अधिकाऱ्यांना विचारावे तर ते उडवाउडवीची उत्तरे देतात. एका कामासाठी अख्खा दिवस जावूनही त्या दिवशी काम होत नाही. मजुरी बुडवून शासकीय कार्यालयात आलेल्यांना निराश होऊन परत जावे लागते. आर्थिक फटकाही सहन करावा लागतो. त्यामुळे अशी मंडळी दलालाच्या विळख्यात अडकतात. विविध कामे ही मंडळी अवघ्या काही वेळातच करून देत असल्याने नागरिकही पैसे देऊन त्यांच्याकडून कामे करून घेतात. शासकीय कार्यालयात दलाल अधिकारी, कर्मचाऱ्याच्याच तोरात वावरताना दिसून येतात.
अनेकदा तर ही मंडळी अवघ्या काही तासात कामही करून देतात. या मंडळींचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत साटेलोटे असल्याचे दिसून येते.
काही अधिकाऱ्यांनी तर थेट आपले एजंट नेमल्याची माहिती आहे. (शहर प्रतिनिधी)
सर्वाधिक गर्दी तहसील कार्यालयात
शहरातील विविध कार्यालयात दररोज गर्दी असतेच. परंतु सर्वाधिक गर्दी असते ती तहसील कार्यालयात विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिक येथे येतात. तासन्तास ताटकळत बसतात. अशा गरजू लोकांना हेरण्याचे काम दलाल करतात. पैसे घेऊन त्यांचे काम करून देतात. अनेकदा तर पैसे देणाऱ्याचीही तक्रार नसते. केवळ काम झाले याचेच समाधान असते.