महागावात भूईमुगाच्या क्षेत्रात विक्रमी वाढ
By admin | Published: April 28, 2017 02:36 AM2017-04-28T02:36:32+5:302017-04-28T02:36:32+5:30
परंपरागत पिकांमुळे कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांनी यंदा आपला मोर्चा भूईमूग पिकाकडे वळविला आहे.
कृषी विभाग : पाच हजार हेक्टरवर पेरा
महागाव : परंपरागत पिकांमुळे कर्जाच्या खाईत लोटलेल्या शेतकऱ्यांनी यंदा आपला मोर्चा भूईमूग पिकाकडे वळविला आहे. गतवर्षीपर्यंत एक हजार हेक्टरवर होणारी भूईमुगाची लागवड यंदा पाच हजार हेक्टरपर्यंत पोहोचली आहे. तालुक्यात चार हजार हेक्टरची विक्रमी वाढ झाली आहे.
महागाव तालुका हा डोंगरदऱ्यात वसलेला आदिवासीबहुल तालुका आहे. येथे कापूस, तूर, सोयाबीन आदी पिके घेतली जातात. परंतु अलिकडे सिंचनाच्या सुविधा वाढल्याने शेतकरी भूईमूग पिकाकडे वळले आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना उन्हाळी भूईमूग लागवडीसाठी प्रोत्साहीत केले. जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गायकवाड यांनी महागाव तालुका कृषी विभागाला भूईमूग लागवड वाढविण्याचे लक्ष्य दिले होते. त्यासाठी ८४५ क्विंटल भूईमूग बियाणे वाटप दोन हजार १५० शेतकऱ्यांना करण्यात आले. वाटप केलेल्या बियाण्यांची किमत साधारणत: एक कोटींच्या आसपास आहे. तालुका कृषी अधिकारी राजकुमार रणवीर, मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी राबविलेल्या अभियानामुळे ओलित असलेल्या शेतकऱ्यांनी भूईमुगाचा पेरा वाढविला. तब्बल चार हजार हेक्टरने क्षेत्र वाढले असून तालुक्यात यंदा भूईमुगाचे विक्रमी पीक येण्याची शक्यता आहे.
कृषी विभागाने केलेला दावा हा बियाणे वाटपावरून केला. वास्तविक भूईमूग बियाणे गरजवंत शेतकऱ्यांना दिले नसल्याचे अंबाडाचे शेतकरी हनवंतराव देशमुख यांनी सांगितले. तसेच बियाण्यांचा काळाबाजार झाल्याच्याही अनेक तक्रारी आहे.