९४ कोटी रूपयांच्या महसुलाची विक्रमी वसुली
By admin | Published: May 9, 2017 01:17 AM2017-05-09T01:17:13+5:302017-05-09T01:17:13+5:30
महसूल विभागाने वर्षभरात विविध विभागाच्या माध्यमातून ९४ कोटी रूपयांच्या महसुलाची वसुली केली.
उद्दिष्टपूर्ती : शेतकऱ्यांच्या शेतसाऱ्यातून मिळाले ३० कोटी
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महसूल विभागाने वर्षभरात विविध विभागाच्या माध्यमातून ९४ कोटी रूपयांच्या महसुलाची वसुली केली. यामध्ये सर्वाधिक ५९ कोटी रूपयांचा महसूल गौण खनिज विभागाने मिळवून दिला आहे. यामुुळे महसूल विभागाला आपली उद्दीष्टपूर्ती करता आली आहे.
यावर्षी महसूल विभागाला ८९ कोटी ५० लाख रूपयांच्या महसुलाच्या वसुलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. यामध्ये शेतजमिनीचा शेतसारा वसूल करण्यासाठी २५ कोटी ४२ लाख रूपयांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ३० कोटी २६ लाख ८५ हजार रूपयांची वसुली केली. ही वसूली ११९ टक्यांच्या घरात आहे. अलिकडील पाच वर्षामध्ये महसूल विभागाला हे उद्दीष्ट प्रथमच पूर्ण करता आले आहे.
यासोबतच जिल्ह्यात गौण खनिजाच्या माध्यमातून ५८ कोटी रूपयांच्या महसुलाच्या वसुलीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले होते. यामध्ये डोलोमाईन्स, मुरूम, गिट्टीचा समावेश आहे.
खनिकर्म विभागाने आपले उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी विशेष मोहिम राबविली. यासोबतच गौण खनिजाच्या चोरांवर दंड आकारला. यामुळे खनिकर्म विभागाला गौण खनिजाचे उद्दीष्ट पूर्ण करता आले आहे. उद्दीष्टापेक्षा अधिक वसुली खनिकर्म विभागाने केली आहे. ही वसुली ५९ कोटींच्या घरात आहे.
करमणूक कर विभागाकडे तीन कोटी ८५ लाख रूपयांच्या कर्ज वसूलीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. करमणूक कर विभागाने निर्धारित कालावधीत तीन कोटी ८७ लाख रूपयांच्या कर्जाची वसुली केली. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या वसुलीचे उद्दीष्ट संबंधित विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पूर्ण केले. यासाठी विशेष मोहीम राबविली होती.
जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांनी मोहीम राबविली. यामुळे महसूल विभागाला आपले उद्दीष्ट पूर्ण करता आले. सर्व कर्मचाऱ्यांच्या एकजूटीने हे उद्दीष्ट पूर्ण करण्यात आले.
- नितीन व्यवहारे
उपजिल्हाधिकारी, (महसूल) यवतमाळ