पीसीआरच्या नावाखाली चक्क वसुली
By Admin | Published: July 27, 2014 12:18 AM2014-07-27T00:18:40+5:302014-07-27T00:18:40+5:30
पोलीस कोठडीत मारहाण करणार नाही, लॉकअपमध्ये त्रास होणार नाही, असा शब्द देवून चक्क गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून पाच ते दहा हजारांपर्यंत वसूली केली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे.
यवतमाळ : पोलीस कोठडीत मारहाण करणार नाही, लॉकअपमध्ये त्रास होणार नाही, असा शब्द देवून चक्क गंभीर गुन्ह्यातील आरोपींकडून पाच ते दहा हजारांपर्यंत वसूली केली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. एवढेच नव्हे तर संशयित आणि नातेवाईकांनाही धमकी देवून त्यांची लूट केली जाते. हा प्रकार यवतमाळ शहर आणि वडगाव रोड ठाण्यात सर्रास सुरू असून वरिष्ठांचे याकडे अक्षम्य दूर्लक्ष होत आहे.
कुंटणखाना आणि दिवसागणीक होणारे प्राणघातक हल्ले हा सद्या चर्चेचा विषय आहे. गंभीर घटनांमध्ये आरोपींना पोलीस कोठडी हमखास मिळणारच अशी शक्यता असते. नेमकी हीच बाब हेरत कुठलीही गंभीर गुन्हेगारी घटना उघडकीस येताच आरोपी हाती कसे येतील, याचा तपास अधिकाऱ्यांकडून प्रयत्न केला जातो. त्यासाठी आरोपीचे नातेवाईक, मित्र मंडळींना दमदाटी करण्यात येते. उगाच त्रास नको म्हणून दोष नसताना नागरिक पैसे देतात.
त्यानंतर आरोपीला आणून देण्यास सांगितले जाते. शोध घेऊन नातेवाईक आरांपीला पोलिसांच्या स्वाधीन करतात. त्यानंतर एकदा का आरोपी हातात आला की, त्याला आपणच गोपनिय माहितीवरून अटक केली, असा रेकॉर्ड तयार केला जातो. बयाण आणि अन्य सोपस्कार आटोपल्यानंतर आरोपीला पोलीस कोठडी मिळणार असल्याचे सांगितले जाते.
कोठडीत मारहाण होऊ नये म्हणून पैशाची मागणी केली जाते. मागणीसाठी मर्जीतील कर्मचारी उपलब्ध झाला नाही तर अपवादात्मक स्थितीत एपीआय व फौजदार थेट मागणीही करतात. वडगाव रोड आणि शहर पोलीस ठाण्यात कार्यरत बहुतांश सहाय्यक पोलीस निरीक्षकच नव्हे तर फौजदारांकडूनही हा प्रकार सर्रास सुरू आहे. (स्थानिक प्रतिनिधी)