दीड हजार कोटींच्या कृषी बिलांची वसुली; वीज कंपनीच्या आदेशाने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर
By रूपेश उत्तरवार | Published: December 7, 2022 11:02 AM2022-12-07T11:02:10+5:302022-12-07T11:05:10+5:30
वसुली मोहीम तीव्र; आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांना थकबाकी भरावी लागणार
यवतमाळ : राज्यभरातील शेतकऱ्यांकडे ४५ हजार कोटी रुपयांची वीजबिले थकली आहेत. ही थकबाकी वसूल करण्यासाठी वीज कंपनीकडून पावले उचलण्यात आली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जुने थकीत बिल न घेता नियमित बिल भरून घेण्याचे सूतोवाच केले होते. यानंतर आता वीज कंपनीला दीड हजार कोटी रुपयांच्या वीजबिलाची वसुली करण्याच्या सूचना मिळाल्या आहेत. त्यामुळे आर्थिक संकटात असतानाही शेतकऱ्यांना थकबाकी भरावी लागणार असल्याने शेतकऱ्यांतून असंतोष व्यक्त केला जात आहे.
अतिवृष्टीने राज्यभरातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले होते. त्यानंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा केली. या नैसर्गिक आपत्तीचा निधी पूर्णपणे अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्याचवेळी वीज कंपनीकडून आता बिलाच्या मोहीम अधिक तीव्र करण्यात येत आहे. गावपातळीवर कृषी फीडर पूर्णत: कोलमडले आहेत. पूर्णवेळ वीज मिळत नाही.
अनेक ठिकाणी डीपी जळाल्या, तर काही ठिकाणी डीपीत फेज नाही. नवीन डीपी देताना वीज कंपनीने शेतकऱ्यांकडून चालू बिल भरल्यानंतरच नवीन डीपी दिली. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक असतानाही शेतकऱ्याकडून वीजबिल भरून घेतले. यामुळे कंपनीविरोधात नाराजी असतानाच आता पुन्हा चालू थकबाकीसाठीच्या वसुली मोहिमेला सामोरे जावे लागणार आहे. नव्या आदेशानुसार थकीत बिलापेक्षा नियमित एक बिल भरून घेण्याच्या सूचना आहेत. यातून नियमित दीड हजार कोटी रुपयांच्या वीजबिलाच्या वसूलीचे नियोजन आहे.
सर्पदंशातील मृत्यूंच्या अहवालाकडे कानाडोळा
पश्चिम विदर्भाच्या वाट्याला रात्रीचा वीज पुरवठा कायम आहे. त्यातही पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, यातून शेतकऱ्यांना दुहेरी संकटाचा सामना करावा लागत आहे. पूर्व विदर्भात जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली. मात्र, त्याचवेळी पश्चिम विदर्भातील रात्रपाळीत ओलीत करताना शेतकऱ्यांच्या झालेल्या मृत्यूची दखल घेतली नाही. या ठिकाणी जंगली जनावरांचाही तितकाच उपद्रव आहे. अशा स्थितीत न्याय सर्वांनाच सारखा मिळावा, अशी मागणी शेतकरी करीत आहे.