वसुलीचा धडाका, पण वीज चोरीकडे महावितरणचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 09:37 PM2018-10-25T21:37:40+5:302018-10-25T21:38:34+5:30
वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचे वीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वीजचोरी आणि थकीत वसुलीसाठी वरिष्ठांनी इशारा देऊनही महावितरणचेवीज चोरीकडे दुर्लक्ष होत आहे. ग्राहकांनी वारंवार तक्रार करूनही महावितरणच्या कामात सुधारणा होत नसल्याचे दिसून येत आहे.
राज्यात विजेची मागणी शिगेला पोहोचली आहे. सोमवारी ही मागणी थेट २४ हजार ९६२ मेगावॅटवर पोहोचली होती. मात्र महावितरणकडे एवढ्या प्रमाणात वीज उपलब्ध नव्हती. परिणामी भारनियमन करण्यात आले. यात वसुली कमी असलेल्या जी-१ ते जी-३ गटातील वाहिन्यांवर तब्बल ९५० मेगावॅट विजेचे भारनियमन करण्यात आले. वसुली कमी असल्यामुळे भारनियमनाचा सामना करावा लागत असल्याने प्रामाणिक ग्राहकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे अशा अनेक परिसरात नियमितपणे देयक भरणारे हजारो ग्राहक आहे. मात्र काही नागरिक वीज चोरी करीत असल्याने प्रामाणिक ग्राहकांना भारनियमनाचा सामना करावा लागत आहे.
थकीत देयक वसुलीसाठी जोमाने प्रयत्न करणारी महावितरणची यंत्रणा तेवढ्याच जोरकसपणे वीजचोरी उघड करण्यात अपयश्ी ठरत आहे. उघड्या डीपीमधून जिल्ह्यात अनेक ठिकाणी थेट वीज चोरी सुरू आहे. ग्रामीण भागात थेट तारांवर आकोडे टाकून वीज चोरी केली जात आहे.
खुद्द यवतमाळ श्हरातही जाम रोड परिसरातील जनकनगरी परिसरात वीज चोरी होत असल्याचा ग्राहकांचा दावा आहे. या परिसरात सतत विजेचा दाब कमी-जास्त होत असल्याने अनेक ग्राहकांच्या घरातील उपकरणे नादुरुस्त झाली आहे. याबाबत नागरिकांनी तक्रारही केली. मात्र अद्याप उपाययोजना करण्यात आली नाही. या परिसरात उघड्या डीपीमधून वीज चोरी होत असल्याचे दिसून येत आहे. त्याकडेही महावितरणचे दुर्लक्ष होत असल्याने वीज चोरटे शिरजोर झाले आहे.
संचालकांच्या इशाऱ्याला वाटाण्याच्या अक्षता
महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी वसुली आणि चोरीकडे दुर्लक्ष करणाºयांवर कठोर कारवाईचा इशरा दिला. विशेष म्हणजे कमी वसुलीमुळे पुसद येथील अभियंत्याला निलंबितही करण्यात आले. त्याउपरही जिल्ह्यात वीज चोरी सुरू आहे. ग्राहकांना दर्जेदार सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचेही खंडाईत यांनी स्पष्ट केले. मात्र ग्राहक सेवेत निष्काळजीपणा व कामचुकारपणा करणाºयांवर कारवाई केली जात नाही. जबाबदारी झटकणाऱ्या अधिकाऱ्यांवर प्रादेशिक संचालकांनी कारवाईचा इशारा दिला. त्यानुसार वीज चोरी पकडणे, तत्काळ जोडणी देणे, वीज चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्याची मोहीम सुरू करण्याची गरज आहे.