माध्यम नव्हे, मेरिटनुसार शिक्षक भरती करा, उमेदवारांची मागणी; मुख्यमंत्र्यांना पाठविले निवेदन
By अविनाश साबापुरे | Published: January 9, 2024 07:42 PM2024-01-09T19:42:30+5:302024-01-09T19:42:42+5:30
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले.
यवतमाळ : राज्यात शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र यात इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील संतप्त उमेदवारांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत धडक देत ‘मेरिट’नुसारच भरती करा, अशी मागणी केली.
यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांकडे निवेदन पाठविण्यात आले. पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. ती अद्यापही पूर्णत्वास गेलेली नाही. मात्र आता गेल्या काही दिवसांपासून विविध स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रिक्त पदांच्या जाहिराती पोर्टलवर अपलोड केल्या जात आहेत. जवळपास १२ हजार पदांच्या जाहिराती या पोर्टलवर आलेल्या आहेत. तर १५ जानेवारीपर्यंत सर्व संस्थांच्या जाहिराती टाकण्याच्या सूचना राज्य स्तरीय यंत्रणेकडून देण्यात आल्या आहेत.
मात्र सध्या आलेल्या जाहिरातींवरून केवळ इंग्रजी माध्यमाच्या डीएड धारकांना प्राधान्य मिळत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. त्यामुळे बहुतांश संख्येत असलेल्या मराठी माध्यमाच्या उमेदवारांवर भरतीत अन्याय होण्याची शक्यता आहे. याच मुद्द्यावरून मंगळवारी अभियोग्यता धारक उमेदवारांनी जिल्हा परिषदेत धडक दिली.
पहिली ते पाचवीच्या वर्गाला गणित व विज्ञान विषय शिक्षक हे पद लागू नाही. त्यामुळे या वर्गांसाठी इंग्रजी माध्यमाच्या उमेदवारांना प्राधान्य देण्याचे कारण नाही. त्याऐवजी मातृभाषेतूनच प्राथमिक शिक्षण झाल्यास शिक्षणाचा पाया पक्का होईल, ही बाब सीईओंच्या निदर्शनास आणून देण्यात आली. कोणत्याही एकाच माध्यमाला शिक्षक भरती प्राधान्य न देता अभियोग्यता परीक्षेतील मेरिटनुसारच पद भरती करण्यात यावी, अशी मागणी यावेळी निवेदनातून करण्यात आली.