एका झाडामुळं शेतकऱ्याचं नशीब फळफळलं, रातोरात झाला ४.९७ कोटींचा मालक!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 19:42 IST2025-04-11T19:39:22+5:302025-04-11T19:42:30+5:30
२०१३-१४ पर्यंत शिंदे कुटुंबाला हे झाड कशाचे आहे? याबाबत माहिती नव्हती, आज त्याच झाडामुळे शिंदे कुटुंब करोडपती बनले आहे.

एका झाडामुळं शेतकऱ्याचं नशीब फळफळलं, रातोरात झाला ४.९७ कोटींचा मालक!
यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याला एका झाडाने एका रात्रीत करोडपती बनवले. केशव शिंदे असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे. केशव शिंदे यांच्या वडिलोपार्जित जमिनीत एक झाड आहे, ज्याचे महत्त्व शिंदे कुटुंबाला अनेक वर्षं माहीती नव्हते, त्याच झाडाचे मूल्य ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे समोर आले आहे.
केशव शिंदे हे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातल्या खुर्शी गावातील रहिवाशी आहेत. शिंदे यांच्या ७ एकरच्या वडिलोपार्जित शेतात एक झाड आहे. २०१३-१४ पर्यंत शिंदे कुटुंबाला हे झाड कशाचे आहे, याबाबत माहिती नव्हती. हे झाड कर्नाटकातून आलेल्या काही लोकांच्या निदर्शनास आले. त्यांनी हे झाड रक्तचंदन प्रजातीचे असल्याचे सांगितले. सुरुवातील शिंदे कुटुंबाने दुर्लक्ष केले. परंतु, या झाडाची किंमत कोट्यावधी असल्याचे समजताच संपूर्ण शिंदे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर रेल्वेने वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन ताब्यात घेतली.
शिंदे कुटुंबाची न्यायालयात धाव
दरम्यान, शिंदे कुटुंबाने खासगी संस्थेमार्फत झाडाचे मूल्यांकन करून घेतले, ज्यात झाडाची किंमत ४ कोटी ९७ लाख रुपये असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, ही रक्कम देण्यास रेल्वे विभाग टाळाटाळ करत होते. अखेर शिंदे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली. मध्य रेल्वेने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात १ कोटी रुपये जमा केले, त्यापैकी नागपूर खंडपीठाने बँकेतून ५० लाख रुपये काढण्याची परवानगी दिली. शिंदे यांना पूर्ण नुकसानभरपाई मिळावी, यासाठी खंडपीठाने झाडाचे मूल्यांकन करण्याचे आदेशही दिले.
लवकरच शिंदे कुटुंबाला उर्वरित रक्कम मिळेल
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्पासाठी पंजाब शिंदे यांची जमीन संपादित करण्यात आली. मूल्यांकनानंतर शेतकऱ्याला उर्वरित रक्कम मिळेल. या याचिकेवर न्यायमूर्ती अविनाश खरोटे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.