पिलखानाच्या सुविधांना ‘रेड’ सिग्नल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:58 PM2019-09-09T22:58:11+5:302019-09-09T22:59:38+5:30
४० घरांची वस्ती असलेल्या पिलखाना (ता.कळंब) गावात २००७ मध्ये गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी शिरले. या गावाचा संपर्क तुटला. तेव्हापासून सदर गाव रेडझोनमध्ये टाकण्यात आले आहे. यानंतर एकदाही या गावाला पुराचा वेढा पडला नाही. परंतु गैरसोयी अधिक निर्माण झाल्या आहे. काही वर्षांपूर्वी मंजूर झालेला सिमेंट रस्ताही रद्द करण्यात आला.
निश्चल गौर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंगरखर्डा : पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने रेड झोनमध्ये गेलेल्या पिलखाना गावाच्या सर्व सुविधा थांबल्या आहे. मागील १२ वर्षांपासून या गावात विकासाचे एकही काम झाले नाही. वैयक्तिक लाभाच्या योजनाही लोकांना दिल्या जात नाही. पावसाचे पाणी पांदण रस्त्यात तुंबल्यामुळे नागरिकांना गुडघाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतो. या दयनीय स्थितीतून बाहेर काढावे, अशी या गावातील नागरिकांची मागणी आहे.
४० घरांची वस्ती असलेल्या पिलखाना (ता.कळंब) गावात २००७ मध्ये गावाजवळून वाहणाऱ्या नाल्याचे पाणी शिरले. या गावाचा संपर्क तुटला. तेव्हापासून सदर गाव रेडझोनमध्ये टाकण्यात आले आहे. यानंतर एकदाही या गावाला पुराचा वेढा पडला नाही. परंतु गैरसोयी अधिक निर्माण झाल्या आहे. काही वर्षांपूर्वी मंजूर झालेला सिमेंट रस्ताही रद्द करण्यात आला.
गावात जाण्यासाठी पांदण वजा गावरस्ता आहे. साधे खडीकरणही या रस्त्याचे झालेले नाही. चिखलमय झालेला हा रस्ता आहे. पाऊस झाल्यास गुडघाभर पाणी साचून राहते. अनेक दिवसपर्यंत पाणी उतरत नाही. नागरिकांना या धोकादायक स्थितीतून मार्ग काढावा लागतो. महिलांना डोक्यावर दळणाचा डबा घेऊन वाट काढावी लागते. लगतच्या शेतातून थोडीफार वाट सापडते पण सरपटणारे आणि वन्य जीवांपासून भीती आहे. पिलखाना गावात असलेल्या शाळेत जाण्यासाठी शिक्षक, कर्मचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. हा प्रश्न या शाळेच्या मुख्याध्यापिका नंदा भोयर यांनी मांडला.