लोकसभेतील पराभवाचे चिंतन
By admin | Published: June 11, 2014 11:34 PM2014-06-11T23:34:28+5:302014-06-11T23:34:28+5:30
लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, यावर विचार मंथन करण्यासाठी अखेर १५ जूनचा मुहूर्त निघाला. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
महिना लोटला : अखेर १५ जूनचा मुहूर्त
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराचा पराभव नेमका कशामुळे झाला, यावर विचार मंथन करण्यासाठी अखेर १५ जूनचा मुहूर्त निघाला. जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक बोलविण्यात आली आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे शिवाजीराव मोघे तब्बल ९३ हजार तर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात संजय देवतळे तीन लाख ७६ हजार मतांनी पराभूत झाले. अनुक्रमे शिवसेनेच्या भावना गवळी आणि भाजपाचे हंसराज अहीर यांनी त्यांचा पराभव केला. या पराभवाने काँग्रेस जणू ‘कोमात’ गेली आहे. राज्यात अन्य भागांमध्ये या पराभवावर लगेच चिंतन झाले. नेमकी कुठे चुक झाली, पराभवामागील कारणे, कोण विरोधात फिरले यावर चर्चा झाली. अमरावतीत तर विधानसभा निवडणुका राष्ट्रवादीसोबत लढू नये असा ठरावच काँग्रेसने घेतला. सर्व जिल्ह्यात लोकसभेतील पराभवाचा विषय लगेच गांभीर्याने घेतला गेला असताना यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटी मात्र त्याला अपवाद ठरली. सुमारे महिनाभरापासून जिल्हा काँग्रेसमध्ये मरणासन्न अवस्था आहे. आरोप-प्रत्यारोप होण्याच्या भीतीने, कार्यकर्त्यांकडून मंत्री, आमदार व नेत्यांचे वाभाडे काढले जाण्याच्या भीतीने काँग्रेसने ही बैठक लांबणीवर टाकल्याचे सांगितले जाते. पराभवाच्या मुद्यावर पक्षाचे कार्यकर्ते बाहेरच खुल्या चर्चा करताना दिसले.
पक्ष स्तरावर मात्र कोणतीच बैठक न झाल्याने पराभवाची कारणे अधिकृतरीत्या पुढे आली नाही.
लोकसभेतील पराभवाची कारणे शोधण्याची जबाबदारी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांवर होती. मात्र त्यांनी त्यासाठी तातडीने बैठक घेतली नाही तर दुसरीकडे या अध्यक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघात उमेदवार कोण असावा म्हणून पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मात्र बैठक घेतली. मीच उमेदवार रहावे असा शब्द वामनराव कासावारांया बैठकीत अप्रत्यक्ष वदवून घेतला. अन्य काही नेत्यांनीही अशी तुकड्या तुकड्या अनौपचारिक बैठका घेतल्या. जिल्हा काँग्रेस कमिटीची मुख्य बैठक निकालाच्या महिनाभरानंतर रविवार १५ जून रोजी दुपारी १ वाजता जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात होत आहे. या बैठकीला खासदार, मंत्री, आमदार, स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी, पक्षाचे पदाधिकारी, सर्व आघाड्यांचे प्रमुख आदींना बोलविण्यात आले आहे. या बैठकीत लोकसभेतील पराभव आणि आगामी विधानसभेतील रणनीतीबाबत चर्चा केली जाणार असल्याचे सांगितले जाते.
काँग्रेसची ही बैठक गाजण्याची चिन्हे आहे. काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी नेत्यांची भीती न बाळगता बैठक गाजविण्याची तयारीही केली आहे. नेत्यांच्या गटबाजीच्या भांडणात निष्ठावंत कार्यकर्ते मात्र सैरभैर झाले आहे. जिल्ह्यात काँग्रेसचे पाच आमदार आणि खुद्द प्रदेशाध्यक्षांचा जिल्हा असूनही लोकसभेत काँग्रेसचे येथील दोनही उमेदवार पराभूत होत असेल तर पक्षाची एकूण अवस्था काय आहे याची कल्पना येते. नेत्यांनी गटबाजी न रोखल्यास विधानसभेतही याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. (जिल्हा प्रतिनिधी)