चेतना अभियानाला मदतीस नकार
By admin | Published: March 12, 2016 02:54 AM2016-03-12T02:54:35+5:302016-03-12T02:54:35+5:30
शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे.
सीईओकडे तक्रार : मनोरंजनावर उधळपट्टी, २००९ च्या वर्गणीचा हिशेबच नाही
यवतमाळ : शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा म्हणून राज्य शासनाकडून यवतमाळ जिल्ह्यात बळीराजा चेतना अभियान राबविण्यात येत आहे. यासाठी दहा कोटींची तरतूदही करण्यात आली आहे. चेतना अभियानाच्या नावावर मनोरंजनात्मक कार्यक्रम केले जात आहेत. अशा स्थितीत जिल्हा परिषद कर्मचारी व शिक्षक संघटनांनी चेतना अभियानाला आर्थिक मदत देण्यास विरोध केला आहे. अभियानासाठी कोणालाही सक्ती केली जाऊ नये,
अशी तक्रार मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे केली.
बळीराजा चेतना अभियान समितीकडून जनजागृतीचे कार्यक्रम, त्रस्त कुटुंबांना शोधून आर्थिक मदत, मुलामुलींचे शिक्षण, आरोग्यावरील खर्चास मदत यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून निधी संकलित करून अभियानाच्या ट्रस्टच्या खात्यात जमा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र या संदर्भात विभागप्रमुखांना कोणतेही आदेश नाहीत. हा मदतनिधी स्वेच्छेने असल्यास निधी कपात करताना कर्मचाऱ्यांची संमती आवश्यक असते, मात्र येथे अशी कुठलीही प्रक्रिया होताना दिसत नाही. एकंदर संभ्रम निर्माण झाला आहे. यापूर्वीसुद्धा २००९ मध्ये जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकडून शेतकरी व शेतमजूर आत्महत्याग्रस्त कुटुंबांना मदत करण्याच्या नावाखाली १०० ते पाचशे रुपये असा निधी जमा करण्यात आला होता.
या निधीचा धनाकर्ष कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण समिती, यवतमाळ यांना देण्याचे निर्देश तत्कालिन सीईओंनी दिले होते. त्यानंतर मात्र निधीचा विनियोग कशाप्रकारे झाला, त्याचा हिशेब देणगीदारांना अद्याप देण्यात आलेला नाही, यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने वारंवार चौकशीची मागणी केली होती. नियमबाह्य पद्धतीने संघटनांना विश्वासात न घेता निधी संकलनाला विरोध असल्याची तक्रार सीईओ मल्लीनाथ कलशेट्टी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर नाकाडे, प्राथमिक शिक्षक संघाचे सुभाष धवसे, महाराष्ट्र शिक्षक भारतीचे गजानन पवार, उर्दू शिक्षक संघटनेचे हयातखान नूरखाँ, अपंग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शहाजी घुले, केंद्रप्रमुख संघाचे अध्यक्ष चंद्रमणी वानखडे, कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष किरण मानकर आदींच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे बळीराजा चेतना अभियानातील वास्तवच पुढे आले आहे. किमान यापुढे तरी झालेल्या चुका सुधारून शेतकऱ्यांसाठी काही रचनात्मक कार्य व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)