बोंड अळीच्या प्रादुर्भाव संदर्भात पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा, सामूहिक सर्वेक्षण करून दिलासा देण्याची केली मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2017 09:25 PM2017-11-10T21:25:42+5:302017-11-10T21:26:48+5:30
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतक-यांचे हातचे पीक वाया गेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली.
यवतमाळ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला असून शेतक-यांचे हातचे पीक वाया गेले आहे. यासंदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी आज नागपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा केली. या नुकसानीसंदर्भात सामूहिक सर्वेक्षण करण्याचे आदेश देऊन शेतक-यांना तात्काळ मदत उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
जिल्ह्यातील नेर, दारव्हा, महागाव आदी तालुक्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. हा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच असून भविष्यात आणखी उग्र रुप धारण करू शकतो. कीड व रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकाचे नुकसान झाल्याची बाब नैसर्गिक आपत्ती, प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या शासन निर्णयात समाविष्ठ नाही. त्यामुळे नुकसानग्रस्त भागाचा सर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून आदेश आवश्यक आहे. अशा भागाचा सामूहिक सर्वे करून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी. कापूस अधिनियम 2010 नुसार नुकसानग्रस्त शेतक-याने यासंदर्भात वैयक्तिक तक्रार करणे गरजेचे आहे. यासंदर्भात 7 तक्रारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत झालेल्या तक्रारींवर कृषी विभागाने सर्वेक्षण केले असले तरी त्यासाठी तलाठी, , ग्रामसेवक, आणि कृषी सहाय्यक यांच्या मार्फत संयुक्त सर्वेक्षण होणे आवश्यक आहे. तसा प्रस्ताव सादर करण्याबाबत पालकमंत्री मदन येरावार यांनी आदेश दिल्यानंतर जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी जिल्हाधिका-यांकडे प्रस्ताव सादर केला आहे. सदर प्रस्ताव जिल्हाधिका-यांमार्फत विभागीय आयुक्तांकडे व आयुक्तांकडून शासनाकडे पाठविण्यात आला आहे.
या प्रस्तावावर तात्काळ निर्णय घेऊन नुकसानग्रस्तांना दिलासा द्यावा, अशी मागणी पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यावर लवकरच सकारात्मक तोडगा काढला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे पालकमंत्री येरावार यांनी सांगितले.