‘एसटी’त अनुकंपाची नियमबाह्य भरती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 11:41 PM2018-12-01T23:41:35+5:302018-12-01T23:42:35+5:30
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपाची नियमबाह्य भरती झाली आहे. एक कर्मचारी निलंबित आणि दोघांवर दोषारोप ठेवल्याने ही बाब सिध्द झाली आहे. सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी) अनुकंपाची नियमबाह्य भरती झाली आहे. एक कर्मचारी निलंबित आणि दोघांवर दोषारोप ठेवल्याने ही बाब सिध्द झाली आहे. सुरक्षा व दक्षता विभागाच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या संदर्भातील वृत्त ‘लोकमत’ने प्रसिध्द केल्यानंतर महामंडळ खडबडून जागे झाले आहे.
कर्तव्यावर असताना कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला ‘एसटी’त अनुकंपा तत्वावर सामावून घेतले जाते. सहानुभूती म्हणून नोकरी देताना महामंडळाने काही नियम टाकले आहे. याची अंमलबजावणी होत नाही. दिवंगत कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला कर्मचारी गट विमा, उपदान, भविष्य निर्वाह निधी, बचत ठेव आदी मार्गाने चार लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम मिळाली असल्यास अनुकंपा नियुक्ती देता येत नाही. कुटुंबातील एकही व्यक्ती सेवेत नसावा, स्थावर मालमत्ता मर्यादेपेक्षा अधिक नसावी, अशा अटी ठेवल्या गेल्या आहेत.
दिवंगत कर्मचाºयाच्या कुटुंबाला आज चार लाखांपेक्षा अधिक रक्कम प्राप्त होते. स्थावर मालमत्ताही अधिक आहे. तरीही अनुकंपा तत्वावर नियुक्ती दिली जात आहे. मात्र महामंडळाने या नियुक्तीची खैरात सुरू केली आहे. सर्व नियम पायदळी तुडवत सर्रास जागा भरल्या जात आहे. ही पदभरती काही अधिकाºयांसाठी अधिक उत्पन्नाचा स्रोतही बनली आहे. हा सर्व प्रकार लोकमतने वृत्तातून मांडला होता. याची दखल घेण्यात आली. यवतमाळ विभागात एक कामगार निलंबित तर दोघांवर दोषारोप ठेवण्यात आला आहे. कागदोपत्री पुरावे सापडल्याने उर्वरित दोघांवरही निलंबणाच्या कारवाईचे संकेत आहे. सुरक्षा व दक्षता विभागाने सखोल चौकशी सुरू केल्याने मोठे घबाड बाहेर येणार असल्याचे सांगितले जात आहे.