पुनर्वसित धारकान्हा विकासापासून कोसो दूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:54 AM2017-07-20T00:54:39+5:302017-07-20T00:54:39+5:30
तालुक्यातील धारकान्हा गाव गत ३६ वर्षांपासून विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडले आहे.
नागरिकांचे निवेदन : गावकऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष
विश्वनाथ महामुने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : तालुक्यातील धारकान्हा गाव गत ३६ वर्षांपासून विविध समस्यांच्या चक्रव्यूहात सापडले आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने येथे वीज, रस्ता, पाणी, आरोग्य आदी समस्या निर्माण झाल्या आहेत.
धारकान्हा हे पुनर्वसित गाव आहे. १९८१ साली गावाचे पुनर्वसन झाले. तेव्हापासून गावात कोणत्याही सुविधा निर्माण केल्या नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस आहे. सर्वत्र चिखल पसरला आहे. त्यातच वीजपुरवठा नसल्याने अंधाराचे साम्राज्य असते. सरपटणारे विषारी प्राणी दिवसा आणि रात्रीही दिसतात. त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. रात्रीच्या वेळी कुणीही गावाबाहेर पडण्याची हिमत करीत नाही.
गावात जीवनावश्यक वस्त धान्य दुकान आणि रॉकेल विक्रेता नाही. दुसऱ्या गावात जावून रॉकेल आणावे लागते. पिण्याच्या पाण्याची सोय नसून नागरिकांना अशुद्ध पाण्यावर तहान भागवावी लागते. रस्त्याचा प्रश्न एवढा बिकट आहे की, दिवसाही जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो. गावचा परिसर पुसद बाजारपेठेशी जोडला आहे. रुग्णांना रात्री-अपरात्री नेणे त्रासाचे होत आहे. समस्यांबाबत गावकऱ्यांनी वेळोवेळी निवेदने दिली. परंतु कुणीही दखल घेतली नाही.
गावकरी धडकले तहसीलवर
गत ३६ वर्षांपासून विकास म्हणजे काय असते, याचे दर्शन न झालेल्या धारकान्हाच्या नागरिकांनी महागाव तहसीलवर धडक दिली. गावातील समस्यांचा पाढा वाचून निवेदन दिले. यावेळी यादव मोरे, पंजाब गादेकर, बाजीराव ढोले, किसन उघडे, शालिग्राम मोरे, वाघाजी इंगळे, गजानन डोंगरे, तानाजी खरात, अंबादास पारस्कर, निसार बेग, सुभाष ढगे, माधव कांबळे, संजय उघडे, रमेश कांबळे, सुरेश जोगदंडे, गजानन कांबळे, लक्ष्मण देवारे, दत्ता भडंगे, अंबादास उघडे, सुभाष मदने, अशोक ढोले, शिवाजी खरात, नामदेव जोगदंडे, संघशील जोगदंडे, राहूल कांबळे, खंडू कांबळे, सीताराम भालेराव, दीपक भालेराव, संजय भिसे, दादाराव मोरे आदी उपस्थित होते.