‘ही घटना माझ्या हद्दीत नाही’च्या कारणापायी शवविच्छेदनासाठी रात्रभर नातेवाईकांनी मारल्या चकरा
By अविनाश साबापुरे | Published: April 4, 2023 06:55 PM2023-04-04T18:55:15+5:302023-04-04T18:56:17+5:30
Yawatmal News उमरखेड तालुक्यातील अकोली येथील एका ३४ वर्षीय इसमाच्या आत्महत्येनंतर ‘ही घटना माझ्या हद्दीत नाही’ असा धोशा लावत चक्क दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांनी शवविच्छेदनच केले नाही. नातेवाईक रात्रभर मृतदेह घेऊन या पीएचसीतून त्या पीएचसीत चकरा मारत राहिले.
यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील अकोली येथील एका ३४ वर्षीय इसमाच्या आत्महत्येनंतर ‘ही घटना माझ्या हद्दीत नाही’ असा धोशा लावत चक्क दोन प्राथमिक आरोग्य केंद्रांनी शवविच्छेदनच केले नाही. नातेवाईक रात्रभर मृतदेह घेऊन या पीएचसीतून त्या पीएचसीत चकरा मारत राहिले. या घटनेने परिसरात संताप निर्माण झाला आहे.
अकोली येथील अंकुश राठोड याने आजारपणाला कंटाळून ३ एप्रिल रोजी रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बिटरगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी ढाणकी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे पाठविला. रात्र झाल्यामुळे शवविच्छेदन करण्यात आले नाही. रात्रभर मृतदेह ढाणकी आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. सकाळी ४ एप्रिल रोजी शवविच्छेदनाची मागणी नातेवाईकांकडून करण्यात आली, परंतु ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन करण्यास नकार दिला. ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रात गाव येत असेल, त्या आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून शवविच्छेदन करून घ्यावे असे त्यांनी सांगितले.
मृताच्या नातेवाईकांनी व मित्र मंडळीने सोनदाभी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याकडे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. परंतु सोनदाभी आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनीसुद्धा शवविच्छेदन करण्यास नकार दिला. त्यामुळे नातेवाईक आक्रमक झाले. मरणानंतरही अंकुशच्या मृतदेह या प्राथमिक आरोग्य केंद्रातून त्या प्राथमिक आरोग्य केंद्रात धक्के खात होता.
आकोलीतील लोकांनी नेत्यांना फोन केले. तर काहींनी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना फोन केला. मात्र दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदनास नकार दिला. त्यामुळे ढाणकी आरोग्य केंद्रासमोर जमलेल्या नातेवाईकांनी दोन्ही डॉक्टरवर कार्यवाहीची मागणी केली. अखेर थेरडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ढाणकीला येऊन माणुसकीच्या नात्याने शवविच्छेदन केले.
अकोली गाव ढाणकी प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत येते. त्यामुळे शवविच्छेदन केले नाही. पोलीस विभागाने मृतदेह ढाणकी आरोग्य केंद्रात रात्री आणल्याने रात्रभर आरोग्य केंद्रात ठेवण्यात आला. त्यामुळे नातेवाईकांनी शवविच्छेदन करण्याची मागणी केली.
- डॉ. स्वाती मुनेश्वर, वैद्यकीय अधिकारी, ढाणकी
शवविच्छेदन करण्यास कोणतेही कार्यक्षेत्र नाही. मृतदेह ढाणकी आरोग्य केंद्रात असल्याने ढाणकीच्या डॉक्टरांनीच मृतदेहावर शवविच्छेदन करायला पाहिजे होते.
- डॉ. डोंगे, वैद्यकीय अधिकारी, सोनदाभी