अभियांत्रिकीच्या प्रवेशाचे निकष शिथील, बारावीच्या गुणांची अट झाली कमी ; राज्य शासनाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 06:57 PM2020-10-10T18:57:10+5:302020-10-10T18:57:21+5:30
बारावीच्या गुणांची अट झाली कमी
यवतमाळ: अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठीच्या पात्रता निकषात राज्य शासनाने शिथीलता आणली आहे. याबाबतचा निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी राजपत्राद्वारे जारी केला.
विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे निकष शुक्रवारी जाहीर झाले. त्यात अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, हॉटेल व्यवस्थापन, विधी, दृश्य कला अशा अभ्यासक्रमांचा समावेश आहे. ताज्या निर्णयानुसार, अभियांत्रिकी पदवीला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीत भौतिकशास्त्र व गणित या अनिवार्य विषयायसह रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र किंवा तांत्रिक व्यवसायिक विषय किंवा शासनाने नमूद केलेले इतर पयार्यी विषय या तीन विषयात किमान ४५ टक्के गुण तर मागासवर्गीय,आर्थिक दुर्बल घटक आणि दिव्यांग विद्यार्थ्यांना ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक आहे.
यापूर्वी अनुक्रमे ५० व ४५ टक्के गुणांची अट होती. मात्र आता गुणांची ही अट शिथील झाल्याने अनेक विद्यार्थ्यांना सध्याच्या कोरोना परिस्थिती मध्ये दिलासा मिळाला असून अभियांत्रिकी अभ्यासक्रमात प्रवेश घेण्याची संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे इतर काही व्यावसायिक अभ्यासक्रमातही बारावीच्या किमान गुणांची अट कमी करण्यात आली आहे.
हा निर्णय अतिशय चांगला आहे. अभियांत्रिकीसारख्या व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्याची अनेकांना संधी मिळणार आहे.
- प्रा. डॉ. विवेक गंधेवार, प्रवेश प्रक्रिया प्रमुख, जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, यवतमाळ