आदिवासी बोली भाषा जतन व संवर्धन केंद्राचे थाटात लोकार्पण
By admin | Published: August 11, 2016 01:06 AM2016-08-11T01:06:51+5:302016-08-11T01:06:51+5:30
शिवणी पोड : देशातील पहिले केंद्र, विद्यार्थ्यांना साहित्य वाटप ....
घाटंजी : राज्यातीलच नव्हे, तर देशातील पहिले आदिवासी बोली भाषा जतन आणि संवर्धन केंद्र शिवणी पोड येथे सुरू झाले आहे. या केंद्राचे उद्घाटन जागतिक आदिवासी अस्मिता दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेत शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मारोती मेश्राम होते.
प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे, सरपंच दुर्गा राठोड, गटशिक्षणाधिकारी मनुताई पखाले, केंद्र प्रमुख काशीनाथ वाघाडे, कोलामी भाषा साहित्यिक शिक्षक पैकुजी आत्राम, विनोद आडे, कान्हुजी आत्राम, बजरंग आत्राम, प्रवीण मडावी, भाऊ पुसनाके, दादा चिकराम आदी उपस्थित होते.
कोलाम समाजातील विद्यार्थ्यांना शिकविलेले कळत नाही, ही बाब प्रदीप जाधव या शिक्षकाच्या लक्षात आली. मग त्यांनी विद्यार्थ्यांकडून कोलामी भाषा शिकून घेतली. त्याचे हस्तलिखित पुस्तक तयार केले. याचा वापर करीत ते विद्यार्थ्यांना शिकवू लागले. या प्रयोगातूनच आदिवासी बोली भाषा जतन व संवर्धन केंद्राची स्थापना करण्यात आली.
याप्रसंगी डॉ. सुचिता पाटेकर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी समयोचित विचार मांडले. यावेळी आॅल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे प्रवीण मडावी यांच्यातर्फे विद्यार्थ्यांना वह्या व पेनचे वाटप करण्यात आले. संचालन रूपेश कावलकर यांनी, तर आभार कुंडलिक आत्राम यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)