मारेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळे दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:46 PM2018-12-16T22:46:34+5:302018-12-16T22:46:49+5:30

तालुक्याचे वैभव ठरू शकतील, असे चार धार्मिक स्थळे तालुक्यात आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही पुरेसे लक्ष देत नसल्याने या धार्मिक स्थळांची दुरवस्था झाली आहे.

Religious places in Maregaon taluka are neglected | मारेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळे दुर्लक्षित

मारेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळे दुर्लक्षित

Next
ठळक मुद्देप्रशासनासह लोकप्रतिनिधींचीही उदासीनता : ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा केवळ नावालाच

लोकमत न्यूज नेटवर्क
मारेगाव : तालुक्याचे वैभव ठरू शकतील, असे चार धार्मिक स्थळे तालुक्यात आहेत. भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या धार्मिक स्थळांकडे प्रशासनासोबतच लोकप्रतिनिधीही पुरेसे लक्ष देत नसल्याने या धार्मिक स्थळांची दुरवस्था झाली आहे. अनेक मंदिरे मोडकळीस आली असून काही वर्षात ही धार्मिकस्थळे नामशेष होण्याची भीती वर्तविली जात आहे.
भौगोलिकदृष्ट्या मारेगाव तालुका हा वनराईने नटलेला आहे. पुरातन काळापासून तालुक्यात काही धार्मिक स्थळे असून तालुक्यातील नागरिकांसह लांबवरून भाविक या धार्मिकस्थळांना वर्षभर भेटी देत असतात. श्रद्धेने पूजापाठ व धार्मिक विधी उरकवतात. वणी-यवतमाळ मार्गावरील जळका येथे हेमाडपंथी महादेवाचे मंदिर आहे. पांडव अज्ञातवासात असताना ते काही काळ या मंदिरात थांबल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर खूप प्राचीन असल्याचे भाविकांचे म्हणणे आहे. या मंदिराला ‘क’ वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा दिला असून निसर्गरम्य वनराईने हा परिसर सजला आहे.
शासनाने १० वर्षापूर्वी या मंदिराच्या विकासासाठी निधी दिला होता. परंतु मंदिराचा विकास होण्यापेक्षा मंदिर भकास अवस्थेत गेले आहे. मंदिराचा बराचसा भाग जीर्ण अवस्थेत असून मंदिर मोडकळीस आले आहे. पुरातत्व विभागाने मंदिराच्या देखभालीकडे लक्ष न दिल्यास मंदिर जमिनदोस्त होण्याची भिती भाविकांमध्ये आहे. असेच हेमाडपंथी पुरातन देविचे मंदिर मच्छिंद्रा येथे आहे. राजकीय पुढारी व भाविक या देवीला नवस बोलतात. नवसाला पावणारी देवी म्हणून या देवीची ओळख पंचक्रोशीत आहे.
नैसर्गीक थंड व गरम पाण्याचेही तेथे झरे आहेत, हे विशेष. परंतु हे मंदिरही आता मोडकळीस आले आहे. तालुक्यातील बोरी गदाजी येथे धुलीवंदनाला खेळली जाणारी गोटमार यात्रा महाराष्ट्रासह इतर राज्यात प्रसिद्ध आहे. या यात्रेला राज्याबाहेरील भाविकही उपस्थित राहतात. संत गदाजी महाराजांचे मंदिर हे नदीतिरावर आहे. इतके प्रसिद्ध मंदिर असतानाही मात्र मंदिराचा कोणताही विकास झाला नाही.
नवरगाव येथील तुळसा माता मंदिरालाही ‘क’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा आहे. मात्र हे मंदिरही विकासापासून वंचित आहे. या मंदिरातही दरवर्षीच यात्रेचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे तालुक्यातील या चारही धार्मिक स्थळांचा शासनाने विकास करावा, अशी तालुक्यातील भाविकांची अपेक्षा आहे.

Web Title: Religious places in Maregaon taluka are neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.