ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीला शेरेबाजी; तरुणाला सक्त मजुरी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2022 11:44 AM2022-12-24T11:44:38+5:302022-12-24T11:46:25+5:30
अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
यवतमाळ : ट्यूशनला पायी जाणाऱ्या विद्यार्थिनीचा पाठलाग करीत तिला टॉन्टिंग करणे, तसेच ऑटोने कट मारणे एका तरुणाला चांगलेच भोवले असून, न्यायालयाने त्याला दोन वर्षाच्या सक्त मजुरीसह दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
जावेद उर्फ गोलू रफीक खान हा मैत्रिणीसोबत ट्यूशनला जाणाऱ्या एका विद्यार्थिनीचा पाठलाग करून टॉन्टिंग करीत होता. तसेच तिच्या नावाने हाक मारून तिला बोलायला भाग पाडत होता. ऑटोने पाठलाग करून त्याने तिला कटही मारला. सततच्या या त्रासाला कंटाळलेल्या या विद्यार्थिनीने ही बाब कुटुंबातील सदस्यांना सांगितली. आरोपी जावेदची घरच्या लोकांनी समजूत काढल्यानंतरही त्याने विद्यार्थिनीचा पाठलाग करीत छेडखानी करणे सुरूच ठेवले. अखेर पीडित विद्यार्थिनीने पोलिस ठाणे गाठून रीतसर फिर्याद दिली.
याप्रकरणी आरोपी जावेद गोलू रफीक खान याच्याविरुद्ध कलम ३५४ (ड) भादंवि व १२ बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा २०१२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सोपान पाटोळे यांनी करून विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. या प्रकरणात न्या. एस. डब्ल्यू. चव्हाण यांनी आरोपी जावेद यास कलम ३५४ (ड) भादंविनुसार एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास दोन महिन्यांची साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. तर कलम १२ मधील बाललैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा २०१२ प्रमाणे एक वर्ष सक्त मजुरीची शिक्षा व एक हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील नीती दवे यांनी काम पाहिले.
छेडछाडीला बसेल लगाम
ट्यूशनला जाणाऱ्या विद्यार्थिनीची छेडछाड करणाऱ्या तरुणाला विशेष अतिरिक्त सत्र न्यायालयाने सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे समाजात चांगला संदेश जावून छेडछाडीच्या घटना कमी होतील, अशी अपेक्षा आहे.