जिल्हा परिषदेला विद्यार्थिनीच्या सुरक्षेचे स्मरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 10:05 PM2018-08-01T22:05:12+5:302018-08-01T22:06:13+5:30
विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये तक्रार पेटी बसवून घेण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : विद्यार्थिनींची सुरक्षितता लक्षात घेता प्रत्येक शाळेत तक्रारपेटी बसविण्याचा शासन आदेश जिल्हा परिषदेने बासनात गुंडाळून ठेवला होता. मात्र आता पंचायतराज समितीचा दट्ट्या येताच वर्षभरानंतर शिक्षण विभागाला तक्रारपेट्यांची आठवण झाली आहे. पीआरसी धडकण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत शाळांमध्ये तक्रार पेटी बसवून घेण्याचे फर्मान सोडण्यात आले आहे.
गेल्या वर्षी मे महिन्यातच शालेय शिक्षण विभागाने जिल्हा परिषदेला याबाबत आदेश दिला होता. जिल्ह्यातील सर्वच व्यवस्थापनाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्येही मुलींसाठी तक्रारपेटी बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाने गेले वर्षभर या आदेशावरील धूळ झटकली नाही. तक्रारपेटीचा विषय किरकोळ मानून केराच्या टोपलीत टाकण्यात आला.
आता २९ आॅगस्टपासून तीन दिवस पंचायतराज समिती जिल्हा परिषदेची झाडाझडती घेणार आहे. यात सर्वाधिक कर्मचारी असलेला शिक्षण विभागच प्रामुख्याने पीआरसीच्या अजेंड्यावर राहण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील काही शाळांनाही समिती प्रत्यक्ष भेटी देणार असल्याचे कळते. यात तक्रार पेटीबाबतचे दुर्लक्ष पीआरसीच्या नजरेत येण्याची दाट भीती आहे. म्हणूनच शिक्षणाधिकाºयांनी सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी आणि मुख्याध्यापकांना तातडीने तक्रार पेट्या बसवून घेण्याचे आदेश दिले
आहे.