विहीर खोदताना आढळले पुरातन घराचे अवशेष

By admin | Published: June 1, 2016 12:03 AM2016-06-01T00:03:02+5:302016-06-01T00:03:02+5:30

शेतात विहीर खोदताना तालुक्यातील फत्तेपूर येथे ३० फूट जमिनीखाली पुरातन घर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

Remnants of an antique house found in digging a well | विहीर खोदताना आढळले पुरातन घराचे अवशेष

विहीर खोदताना आढळले पुरातन घराचे अवशेष

Next

फत्तेपूरची घटना : ३० फूट खड्ड्यातील रहस्य पाहण्यासाठी गर्दी, प्रशासनाने घेतली दखल
किशोर वंजारी नेर
शेतात विहीर खोदताना तालुक्यातील फत्तेपूर येथे ३० फूट जमिनीखाली पुरातन घर आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. हा प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली असून प्रशासनाने याबाबीची माहिती पुरातत्व विभागाला दिली आहे.
नेर शहरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर फत्तेपूर गाव आहे. नेर येथील साहेब खॉ यांचे शेत आहे. या शेतात त्यांनी काही दिवसापूर्वी जेसीबीच्या सहाय्याने विहिरीचे खोदकाम सुरू केले. खोदकाम करताना जमिनीपासून ३० फूट अंतरावर विटाचे बांधकाम असलेले पुरातन घर आढळून आले. हा प्रकार पाहून ते थक्क झाले. या प्रकाराची माहिती गावातील नागरिकांना मिळाली. त्यामुळे नागरिकांनी हा प्रकार पाहण्यासाठी येथे गर्दी केली. विशेष म्हणजे या घरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. घराच्या दरवाज्यात फुटलेल्या माठाचे तुकडेही आढळून आले आहे. कोरीव दगडाचे बांधकाम आहे. नेमका हा काय प्रकार आहे, हे कुणालाही कळायला मार्ग नाही. त्यामुळे विविध चर्चा सुरू आहे.
सदर शेतापासून रत्नापूर-फत्तेपूर ही दोन गावे आहे. दोनही गावे तीन किलोमीटर अंतरावर आहे. तसेच सदर शेताच्या सातबाऱ्यावर या ठिकाणी जुन्या विहिरीची नोंद असल्याचे सांगण्यात आले. पंचायत समितीने दिलेल्या धडक सिंचन योजनेतून या विहिरीचे खोदकाम करण्यात येत आहे. मात्र आता या ठिकाणी पुरातन घर सापडल्याने शेत सध्या तालुक्यात चर्चेचा विषय झाले आहे. याबाबतची माहिती प्रभारी तहसीलदार पी.आर. ताकसांडे यांना देण्यात आली. त्यांनी तत्काळ आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांना या ठिकाणी जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले. तर पोलीस निरीक्षक विजय गराड यांनी शेतात जाऊन या विहिरीची पाहणी केली.
याबाबतची माहिती पुरातत्व विभागाला कळविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या परिसरात उत्खनन केल्यास आणखी पुरातन अवशेष सापडण्याची दाट शक्यता आहे. सध्या मात्र तालुक्यात या रहस्यमय घराची चर्चा जोरात सुरू आहे.

Web Title: Remnants of an antique house found in digging a well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.