अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2022 05:00 AM2022-01-02T05:00:00+5:302022-01-02T05:00:25+5:30

नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे.

Remove encroachments, clear the way | अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा

अतिक्रमण काढा, रस्ता मोकळा करा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरातील रस्त्यांवर सर्वच बाजूंनी अतिक्रमण झालेले आहे. गोरगरिबांपेक्षा धनदांडग्यांनीच रस्त्यावर दुकाने वाढवून ताबा घेतला आहे. ते रस्ते तत्काळ मोकळे करा, अन्यथा नगरपालिकेचा बुलडोझर चालणार, अशा स्वरूपाच्या नोटिसा अतिक्रमणधारकांना बजावण्यात येत आहेत. दारव्हा मार्गावरील २०० च्या वर अतिक्रमणधारकांना या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
नगर परिषदेच्या मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी पालिकेच्या विस्कटलेल्या प्रशासनाची घडी योग्यरीत्या बसविली आहे. आता पालिका प्रशासन शहरात अस्तित्वात आहे, हे दृश्यस्वरूपात दिसत आहे. शहर स्वच्छतेसोबतच अतिक्रमणासारखी गंभीर समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र पथकच गठित करण्यात आले आहे. अभियंता निखिल पुराणिक यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून ही धडक मोहीम राबविण्यात येत आहे. तत्पूर्वी अतिक्रमणधारकांना तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला जात आहे. वाघापूर ते लोहारा बायपासचे अतिक्रमण काढले जाणार आहे. भोसा मार्गावर असलेल्या अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावल्या जाणार आहेत. दारव्हा नाका ते लोहारा रस्त्यावरचे अतिक्रमण जेथे शोरूम व मोठ्या व्यावसायिकांनी ॲप्रोच रोड हडपला आहे, त्यांच्यावरही कारवाई होणार आहे. पांढरकवडा मार्ग, आर्णी मार्गसुद्धा अतिक्रमणमुक्त होणार आहे.

१५० जणांचे अतिक्रमण काढले
- कळंब चौक व सेवानगर भागातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. कधी नव्हे तो हा परिसर मोकळा झाला आहे. या ठिकाणी १५० जणांचे अतिक्रमण काढण्यात आले. आता ही मोहीम कळंब चौकापुढेही नागपूर मार्गावर राबविली जाणार आहे. रस्त्यावर फोफावलेल्या अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडीची सर्वात मोठी समस्या निर्माण झाली आहे. या वाहतूक कोंडीमुळे अपघात घडतात. अतिक्रमण झाल्याने गुन्हेगारीलाही पाठबळ मिळते. एक ना अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. अतिक्रमण बाजूला सारून वाहतूक सुरळीत केली जाणार आहे. 

अतिक्रमणामुळे रस्ते बाधित झाले आहेत, तर काही ठिकाणी सांडपाण्याच्या नाल्या तुंबल्या आहेत. यातून वाहतुकीची समस्या व आरोग्याची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांनी या दोन्ही प्रमुख समस्या सोडविण्यासाठी सहकार्य करावे. अतिक्रमण मोहीम ही नागरिकांच्या सुविधेसाठीच राबविली जात आहे.
- माधुरी मडावी, मुख्याधिकारी, यवतमाळ

 

Web Title: Remove encroachments, clear the way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.