प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 11:30 PM2018-10-12T23:30:32+5:302018-10-12T23:31:30+5:30

वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका स्त्रीरोग विभागाला बसला असून येथील चक्क एक युनिट बंद करावे लागले. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता ‘रेफर’ करण्याची नामुष्की ओढवली आहे.

Repentance of maternity patients | प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की

प्रसूती रुग्णांच्या रेफरची नामुष्की

Next
ठळक मुद्दे‘मेडिकल’ कॉलेज : २० डॉक्टरांंच्या बदल्या, स्त्रीरोग विभागालाच कळा

सुरेंद्र राऊत।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. याचा सर्वाधिक फटका स्त्रीरोग विभागाला बसला असून येथील चक्क एक युनिट बंद करावे लागले. प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना आता ‘रेफर’ करण्याची नामुष्की ओढवली आहे.
वैद्यकीय महाविद्यालयात औषधशास्त्र, अस्थीव्यंगोपचारशास्त्र, मनोविकृती विभाग, दंतशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, त्वचा व गुप्त रोग, क्षयरोग या सात सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. बदलीनंतर ही पदे भरलीच गेली नाही. सहयोगी प्राध्यापकांचीही चार पदे रिक्त आहेत. शल्यचिकित्सा एक, बधिरीकरण, न्यायवैद्यक, नेत्र चिकित्सा येथील पदे रिक्त आहेत. सहायक प्राध्यापकाच्या शरीरक्रिया शास्त्र विभागातील दोन, न्यायवैद्यक शास्त्र विभागातील तीन, पीएसएम विभागातील एक, स्त्री रोग विभागातील एक अशी पदे रिक्त आहेत. याशिवाय स्त्री रोग विभागातील तब्बल सात सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. याच विभागात सर्वाधिक काम असून महिन्याकाठी ८०० प्रसूती होतात. यामध्ये सरासरी ६०० नॉर्मल, तर २०० प्रसूती सिझरद्वारे केली जाते. मंजूर डॉक्टरांची पदेच कामाच्या तुलनेत कमी पडत आहे. असे असताना येथील सहायक प्राध्यापकांची बदली झाली. परिणामी एक युनीट बंद करण्याची नामुष्की महाविद्यालय प्रशासनावर ओढवली. दोन युनीटमध्ये एक विभाग प्रमुख आणि एक सहयोगी प्राध्यापक यांच्या भरवशावर कामकाज सुरू आहे. त्यांच्या मदतीला वरिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकारी १६, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी २६, सीपीएससाठी आलेले तीन डॉक्टर एवढ्यांवरच कामाचा गाडा सुरू आहे. सहायक प्राध्यापक नसल्याने मोठी अडचण जात आहे. प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांची संख्या अधिक असून पुरेसे डॉक्टर नसल्याने ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना रेफर केले जाते. या सर्वांमध्ये आशा स्वयंसेविकेची मोठी पंचाईत होत आहे. महाविद्यालय प्रशसनाने शासनस्तरावर ही परिस्थिती मांडली असून त्यावर अद्याप तरी तोडगा निघालेला नाही. इतरही विभागातील प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व सहायक प्राध्यापकाची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे. यवतमाळसारख्या दुर्गम जिल्ह्यात दरदिवशी बाह्य रुग्ण तपासणी विभागात दोन हजार रुग्ण येतात. यातील ७०० च्यावर रुग्ण भरती होतात. अशा स्थितीत डॉक्टर असणे आवश्यक आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व मंत्र्यांनीही पाठपुरावा करण्याची गरज आहे.
तीन महिन्यांसाठी दोन डॉक्टर
अधिष्ठाता डॉ.मनीष श्रीगिरीवार यांनी शासनस्तरावर पाठपुरावा केल्यानंतर स्त्रीरोग विभागासाठी नागपूर मेडिकल कॉलेज व इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज येथून दोन सहायक प्राध्यापक तीन महिन्यांकरिता देण्यात येणार आहे. पूर्णवेळ डॉक्टर मिळावे यासाठीची फाईल मंत्रालयात पडून आहे.

Web Title: Repentance of maternity patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.