पायल तडवी आत्महत्याप्रकरणी अॅट्रॉसिटी नोंदवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 09:41 PM2019-05-27T21:41:37+5:302019-05-27T21:42:15+5:30
अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली नाही. ही कारवाई करावी तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन समितीवर कारवाई व्हावी, असे निवेदन विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याने होत असलेल्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी आत्महत्या केली. याप्रकरणी तीन महिला डॉक्टरांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र अॅट्रॉसिटी अॅक्ट अंतर्गत कारवाई झाली नाही. ही कारवाई करावी तसेच रुग्णालयाच्या प्रबंधन समितीवर कारवाई व्हावी, असे निवेदन विविध संघटनांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
मुंबईतील बीवायईएल नायर हॉस्पिटलमध्ये स्नातकोत्तर शिक्षण घेत असलेल्या पायल तडवी हिने आत्महत्या केली. जातीवाचक टिप्पणी करून होत असलेल्या मानसिक छळामुळे तिने आत्महत्या केली. प्रकरणी डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहर व डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्याविरूद्ध भादंवि कलम ३०६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कारवाई झाली नाही. प्रबंधक कमिटीनेही डॉ. तडवी यांनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केले. या प्रबंध प्रमुखावरही गुन्हा नोंदवावा, असे निवेदनात नमूद केले आहे.
सदर प्रकरणी तत्काळ कारवाई व्हावी तसेच डॉ. पायल तडवीच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत करून अॅट्रॉसिटी कायद्यात नमूद रोख रक्कमही द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर यवतमाळ नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष आनंद गायकवाड, नवनीत महाजन, संजय बोरकर, पद्माकर घायवान, भीमसिंह चव्हाण, गोविंद मेश्राम, अॅड. जयसिंह चव्हाण, अशोक वाकोडे, अरविंद खोब्रागडे, मंगला जाधव, सुनील पुनवटकर, अशोक शेंडे, राजेश जुनगरे, संतोष कांबळे, डॉ. मिलिंद साबळे, चंद्रबोधी घायवटे, अशोक इंगोले, अशोक ताकसांडे, अॅड. धनंजय मानकर, अॅड. प्रवीण धुळधुळे, सिद्धार्थ भवरे, राजेंद्र कांबळे आदींच्या स्वाक्षºया आहेत.