जुगार सुरू आहे.. एसपीकडे तक्रार करा; पोलीस शिपायाचा तक्रारदारालाच उलट सल्ला

By सुरेंद्र राऊत | Published: November 4, 2022 06:00 PM2022-11-04T18:00:18+5:302022-11-04T18:07:27+5:30

तक्रार घेवून आलेल्या युवकाला दमदाटी

report to SP, police constable rages on a youth who brought a complaint about gambling | जुगार सुरू आहे.. एसपीकडे तक्रार करा; पोलीस शिपायाचा तक्रारदारालाच उलट सल्ला

जुगार सुरू आहे.. एसपीकडे तक्रार करा; पोलीस शिपायाचा तक्रारदारालाच उलट सल्ला

Next

यवतमाळ : शहरासह जिल्ह्यात राजरोसपणे मटका, जुगार अड्डे सुरू आहेत. यावर स्थानिक पोलिसांकडून कुठेच कारवाई केली जात नाही. असा जुगार सुरू असल्याची तक्रार करणाऱ्यालाच उलट शब्दात सुनावले जाते. कळंब शहरात सुरू असलेल्या जुगाराची तक्रार एका युवकाने केली. वारंवार फोन केल्यानंतर पोलीस शिपाई घटनास्थळी पोहोचला. मात्र त्याने जुगारी पकडण्याऐवजी तक्रारदाराचीच कानउघाडणी करीत जुगार सुरू आहे तर थेट एसपीकडे तक्रार कर, मला त्रास कशाला देतो, असे सुनावले.

दिनेश वानखेडे या युवकाने धाडस दाखवित परिसरातील पानटपरी मागे सुरू असलेल्या जुगाराची माहिती पोलिसांना दिली. मात्र त्याला वेळेत प्रतिसाद मिळाला नाही. जुगारी पकडले जावे व हा अवैध धंदा कायमस्वरूपी बंद व्हावा या भावनेतून त्याने फोनवरून तक्रार केली. वारंवार फोन केल्यामुळे पोलीस शिपाई अजय शेंडे हा घटनास्थळी पोहोचला. मात्र त्याने कारवाई करण्याऐवजी तक्रार करणाऱ्यालाच फैलावर घेतले. तू ठाणेदाराकडे भेट नाही तर एसपीकडे तक्रार कर अशा शब्दात सुनावले. हा सर्व प्रकार तक्रारदार युवकाने मोबाईलमध्ये चित्रीत केला आहे.

कळंब सारखी स्थिती सर्व जिल्ह्यातील झाली आहे. अवैध धंदे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीने सुरू आहे. कारवाईसाठी शिपाई, जमादाराला पाठविले जाते. पैसा मात्र अधिकारी वर्गाकडे जातो. त्यामुळे अवैध व्यावसायिक पोलीस शिपाई, जमादाराला जुमानत नाहीत. एखादवेळेस वरिष्ठांच्या पथकाने धाड टाकली तर संबंधित बीट जमादाराला जबाबदार धरुन कारवाई केली जाते. प्रत्यक्षात मात्र ठाणेदार व त्यांचे रायटर यांनीच अशा व्यवसायाला मूक परवानगी दिलेली असते.

महिन्याचे हप्ते येतात. धंदा बंद करण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीट जमादाराला कोंडीत पकडले जाते. त्यामुळे बरेचजण नाईलाजाने अशा अवैध व्यवसायावर कारवाई करू शकत नाही. अवैध व्यवसायासाठी ठाणेदारावरही बीट जमादाराइतकी जबाबदारी निश्चित केली जावी, तरच या अवैध व्यवसायाला नियंत्रणात ठेवता येईल. रस्त्यावरील मटका अड्डे, जुगार क्लब नियंत्रणात राहतील, यातून पुढील गुन्हे होणार नाही, असे पोलीस वर्तुळातून जाणकारांकडून सांगितले जाते.

Web Title: report to SP, police constable rages on a youth who brought a complaint about gambling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.