जिल्हा पत्रकार संघाचे एसपींना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 10:10 PM2019-01-29T22:10:48+5:302019-01-29T22:11:55+5:30
वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दोन शिपायांवर कठोर कारवाईची मागणी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : वृत्त संकलनासाठी वणी येथे गेलेल्या वृत्त वाहिनीच्या दोन प्रतिनिधींना दोन पोलीस शिपायांनी धक्काबुक्की करून ठाण्यात डांबले. ही घटना सोमवारी सायंकाळी घडली. याचे पडसाद जिल्हाभर उमटले असून यवतमाळ जिल्हा पत्रकार संघाने पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन त्या दोन शिपायांवर कठोर कारवाईची मागणी केली.
वणी येथील पोलीस शिपायांच्या कृत्याचा पत्रकार संघाच्यावतीने निषेध करण्यात आला. स्थानिक तिरंगा चौकात पत्रकारांनी धरणे दिले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांना निवेदन देण्यात आले.
वणी येथे वृत्तांकनासाठी गेलेले पत्रकार श्रीकांत राऊत व नितीन राऊत यांना पोलीस शिपाई रत्नपाल मोहाडे व अजय शेंडे यांनी धक्काबुक्की करत पोलीस ठाण्यात डांबले. इतकेच नव्हेतर नितीन राऊत याला मारहाणही केली. त्यानंतर घटनेची तक्रार नोंदविण्यास टाळाटाळ केली. उलट पोलीस निरीक्षकासमोरच रत्नपाल मोहाडे याने पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात गोवण्याची धमकी दिली. या दोन्ही पोलीस शिपायांविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी पत्रकारांनी केली.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन्ही पोलीस शिपायांना मुख्यालयात हलविणार असल्याचे सांगितले. तसेच प्राथमिक तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही दिली. झालेल्या घटनेबद्दल पोलीस अधीक्षकांनी माध्यम प्रतिनिधींकडे दिलगिरी व्यक्त केली.