महापरीक्षा पोर्टल रद्दसाठी नेर येथे निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 11:57 PM2018-10-03T23:57:33+5:302018-10-03T23:58:57+5:30
पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर : पदभरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले महापरीक्षा पोर्टल विद्यार्थ्यांसाठी नुकसानकारक ठरत आहे. सदर पोर्टल रद्द करावे, ही मागणी घेऊन विद्यार्थ्यांनी नायब तहसीलदार राजेंद्र चिंतकुटलावार यांना निवेदन सादर केले.
महापरीक्षा पोर्टलचा भोंगळ कारभार अनेक परिक्षांमध्ये उघड झाला आहे. सामूहिक कॉपी, वेळेवर परिक्षा न होणे, बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी न घेणे, क्रमांकानुसार परीक्षार्थी न बसविणे, प्रश्नांची उत्तरे चुकीची देणे, निकाल वेळेवर न लावणे आदी प्रकार या पोर्टलकडून सुरू आहेत.
पुढील काळात ७२ हजार जागांची पदभरती होणार आहे. महापरीक्षा पोर्टलवरच ही पदभरती घेतली जाणार आहे. त्यामुळे परीक्षा आॅनलाईन न घेता आॅफलाईन घ्याव्या, तसेच महापरीक्षा पोर्टल रद्द करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. प्रज्ञा वासनिक, गायत्री वेलुकर, भारती रंगारी, कीर्ती केवट, प्रियंका खडसे, प्रवीण पाटमासे, हर्षल राऊत आदींनी निवेदन सादर केले.