राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरमधून ५० रेड्यांची सुटका
By विलास गावंडे | Published: April 29, 2023 05:01 PM2023-04-29T17:01:43+5:302023-04-29T17:02:31+5:30
Yawatmal News एका कंटेनरमध्ये कोंबून तेलंगणा राज्यात वाहतूक होत असलेल्या ५० रेड्यांची पोलिसांनी सुटका केली.
यवतमाळ : एका कंटेनरमध्ये कोंबून तेलंगणा राज्यात वाहतूक होत असलेल्या ५० रेड्यांची पोलिसांनी सुटका केली. या प्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून सुमारे ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास वडकी (ता.राळेगाव) पोलिसांनी केली.
गोपनीय माहितीच्या आधारे वडकीचे ठाणेदार विजय महाले यांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सातवरील बोरी इचोड गावाजवळ सापळा रचला. नागपूरवरुन तेलंगणा राज्यात जात असलेल्या एचआर ४७ - डी २७३९ या क्रमांकाच्या कंटेनरची तपासणी करण्यात आली. या कंटेनरमध्ये तब्बल ५० रेडे आढळून आले. या प्रकरणी कंटेनर चालक सारुक सहिद (हरियाणा) व त्याचे साथीदार इनामुल अकतर, सुधाकर कल्याण सुंदरम (तामिळनाडू) या तीन जणांना वडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलीसांनी ५० रेड्यांसह कंटेनर, असा एकूण ४० लाखांचा मुद्देमाल जप्त केला. जप्त करण्यात आलेले रेडे वणी तालुक्याच्या रासा येथील गोरक्षणाच्या ताब्यात देण्यात आले. ही कारवाई वडकीचे ठाणेदार विजय महाले, पोलिस जमादार अरुण भोयर, पोलिस अंमलदार अविनाश चिकराम, नीलेश वाढई, विजय बशेशंकर, विकेश ध्यावर्तीवार, अरविंद चव्हाण यांनी यांनी केली.