पुरात अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकॉप्टरला योग्य जागा मिळेना, शेवटी बोटीने भागविले काम
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 05:45 PM2023-07-22T17:45:02+5:302023-07-22T17:48:19+5:30
जिल्हा प्रशासनाने या नागरिकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी थेट छत्तीसगडवरून हेलिकॉप्टर मागविले
महागाव (यवतमाळ) : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी छत्तीसगडवरून हेलिकॉप्टर मागविण्यात आले. मात्र हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी ऐनवेळी योग्य जागाच मिळाली नाही. त्यामुळे हेलिकॉप्टर खडका गावात उतरविण्यात आले. तर आनंदनगरातील नागरिकांना ऐनवेळी बोटीद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यातील अनंतवाडी गटग्रामपंचायतीमधील आनंदनगर ही छोटीशी वस्ती पूस नदीच्या विस्तीर्ण पात्रातील एका छोट्या टेकडीवर वसली आहे. तेथील नागरिकांना नदीपात्रातूनच येण्याजाण्याचा मार्ग शोधावा लागतो. परंतु सध्या सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे या वस्तीला भयंकर पुराचा वेढा पडल्याने सर्व नागरिक अडकून पडले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांनी मदतीची याचना सुरू केली.
यवतमाळमध्ये निसर्गाचं रौद्ररुप; पुरामध्ये ४५ जण अडकले, बचावकार्य सुरू
जिल्हा प्रशासनाने या नागरिकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी थेट छत्तीसगडवरून हेलिकॉप्टर मागविले. शनिवारी दुपारी साधारण ४.३० वाजताच्या सुमारास हेलिकॉप्टर महागाव तालुक्यात दाखल झाले. परंतु तालुक्यात कुठेच हेलिपॅड नसल्यामुळे लॅन्डींगचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय हेलिकॉप्टरला उतरविण्यासाठी अनंतवाडीनजीक जागाच नव्हती. त्यामुळे हेलिकाॅप्टर खडका गावात उतरविण्यात आले. यादरम्यानच्या काळात आनंदनगरातील नागरिकांना बचाव पथकाने बोटीद्वारे नदीकाठावर आणणे सुरू केले. त्याचवेळी हेलिकॉप्टरही नदीपात्राच्या जवळपास पोहोचले. आता बोट आणि हेलिकॉप्टर अशा दोन्ही माध्यमातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.