आनंदनगरातील अडकलेल्या नागरिकांचे बचावकार्य सुरू; हेलिकाॅप्टरला योग्य जागा मिळेना
By विशाल सोनटक्के | Published: July 22, 2023 06:25 PM2023-07-22T18:25:42+5:302023-07-22T18:25:51+5:30
गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले.
महागाव (यवतमाळ) : गुरुवारी रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील आनंदनगर या छोट्याशा खेड्यातील ४५ नागरिक पूस नदीच्या पुरात अडकून पडले. त्यांना बाहेर काढण्यासाठी छत्तीसगडवरून हेलिकाॅप्टर मागविण्यात आले. मात्र हेलिकाॅप्टर उतरविण्यासाठी ऐनवेळी योग्य जागाच मिळाली नाही. त्यामुळे हेलिकाॅप्टर खडका गावात उतरविण्यात आले. तर आनंदनगरातील नागरिकांना ऐनवेळी बोटीद्वारे बाहेर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यातील अनंतवाडी गटग्रामपंचायतीमधील आनंदनगर ही छोटीशी वस्ती पूस नदीच्या विस्तीर्ण पात्रातील एका छोट्या टेकडीवर वसली आहे. तेथील नागरिकांना नदीपात्रातूनच येण्याजाण्याचा मार्ग शोधावा लागतो. परंतु सध्या सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे या वस्तीला भयंकर पुराचा वेढा पडल्याने सर्व नागरिक अडकून पडले आहे. शुक्रवारी रात्रीपासूनच त्यांनी मदतीची याचना सुरू केली. जिल्हा प्रशासनाने या नागरिकांना पुराच्या वेढ्यातून बाहेर काढण्यासाठी थेट छत्तीसगडवरून हेलिकाॅप्टर मागविले. शनिवारी दुपारी साधारण ४.३० वाजताच्या सुमारास हेलिकाॅप्टर महागाव तालुक्यात दाखल झाले.
परंतु तालुक्यात कुठेच हेलिपॅड नसल्यामुळे लॅन्डींगचा प्रश्न निर्माण झाला. शिवाय हेलिकाॅप्टरला उतरविण्यासाठी अनंतवाडीनजीक जागाच नव्हती. त्यामुळे हेलिकाॅप्टर खडका गावात उतरविण्यात आले. यादरम्यानच्या काळात आनंदनगरातील नागरिकांना बचाव पथकाने बोटीद्वारे नदीकाठावर आणणे सुरू केले. त्याचवेळी हेलिकाॅप्टरही नदीपात्राच्या जवळपास पोहोचले. आता बोट आणि हेलिकाॅप्टर अशा दोन्ही माध्यमातून नागरिकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहे.