संशोधनावर आधारित ‘आविष्कार - २०१६’
By admin | Published: September 23, 2016 02:45 AM2016-09-23T02:45:16+5:302016-09-23T02:45:16+5:30
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या निर्देशानुसार येथील अमोलकचंद महाविद्यालयात संशोधनावर आधारित ‘आविष्कार - २०१६’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
जिल्हास्तरीय स्पर्धा : अमोलकचंद महाविद्यालयाचे आयोजन
यवतमाळ : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापिठाच्या निर्देशानुसार येथील अमोलकचंद महाविद्यालयात संशोधनावर आधारित ‘आविष्कार - २०१६’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता या स्पर्धेला सुरूवात होणार आहे.
स्पर्धेत सर्व शाखेचे पदवीधर, पदव्युत्तर, पीएच.डी.चे विद्यार्थी तसेच एमफील व पीएच.डी. करणारे शिक्षकही सहभागी होऊ शकतात. समाज विज्ञान, भाषा, फाईन आर्टस्, वाणिज्य विज्ञान, शेतीशास्त्र, पशू वैद्यकशास्त्र, औषधीशास्त्र यासंबंधित विद्यार्थीही यात सहभागी होणार आहेत. स्पर्धेचे जिल्हा समन्वयक म्हणून कुलगुरू डॉ. मुरलीधर चांदेकर यांनी अमोलकचंद महाविद्यालयाच्या भौतिकशास्त्र विषयाचे प्रा.डॉ. अजय लाड यांची नियुक्ती केली आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी १० आॅक्टोबरपर्यंत महाविद्यालयामार्फत नोंदणी पाठविणे आवश्यक आहे. संशोधनाची एक प्रत जिल्हा समन्वयक व विद्यापिठाला पाठवावी लागणार आहे. प्रत्येक महाविद्यालयाने रिसर्च कन्व्हेंशन घेऊन जिल्हास्तराला विद्यार्थी निवडयचा आहे. यानंतर संपूर्ण माहिती व संशोधन साहित्यासह जिल्हा समन्वयकांशी संपर्क करायचा आहे.
यवतमाळ जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य व मार्गदर्शक प्राध्यापकांनी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्याना प्रोत्साहित करावे, असे आवाहन अमोलकचंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.ए. मिश्रा यांनी केले आहे. (वार्ताहर)