आक्रोश आणि हुंदक्यांनी आसमंत गहिवरला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 11:26 PM2018-09-26T23:26:26+5:302018-09-26T23:28:49+5:30
आयुष्याची स्वप्न रंगवत असताना त्यांना अगदी तारूण्यातच मृत्युने गाठले. नदीत गणेश विसर्जनाचे निमित्त झाले अन् एकाचवेळी तिघांवर मृत्यूने घाला घातला. मंगळवारी एकावर तर बुधवारी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलगांच्या आक्रोशाने आसमंतही गहिवरून गेला.
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : आयुष्याची स्वप्न रंगवत असताना त्यांना अगदी तारूण्यातच मृत्युने गाठले. नदीत गणेश विसर्जनाचे निमित्त झाले अन् एकाचवेळी तिघांवर मृत्यूने घाला घातला. मंगळवारी एकावर तर बुधवारी दोघांवर एकत्रित अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातलगांच्या आक्रोशाने आसमंतही गहिवरून गेला. पाणावलेल्या डोळ्यांच्या कडा पुसत हजारो उपस्थितांनी या तरुणांना अखेरचा निरोप दिला.
गेल्या पंधरवड्यात लागोपाठ सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण पांढरकवडावासी अक्षरश: हादरून गेले आहेत. ऐन पोळ्याच्या तीन बालकांचा खड्ड्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडून अवघे पंधराही दिवस होत नाही तोच खुनी नदीने तीन युवकांचा बळी घेतला. सोमवारी रात्री गणेश विसर्जनादरम्यान नदीच्या प्रवाहात तीन युवक वाहून गेले. पैैकी नितीन गेडाम याचा मृतदेह मंगळवारी दुपारी हाती लागला, तर शुभम गेडाम व पृथ्वीराज पेंदोर या दोघांचे मृतदेह बुधवारी सकाळी गवसले. शवविच्छेदनानंतर दोघांचेही पार्थिव त्यांच्या शिक्षक कॉलनीतील घरी नेण्यात आले. काहीवेळानंतर निघालेलय अंत्ययात्रेत शहरातील सर्वस्तरातील हजारो नागरिक सहभागी झाले होते. शुभम सुरेश गेडाम, पृथ्वीराज चरणदास पेंदोर व पिंटु उर्फ नितीन रोहिदास गेडाम हे तिघेही मित्र कॉलनीतील रहिवासीयांच्या सहकार्याने दरवर्षी गणेशोत्सव साजरा करायचे. शुभम हा सध्या घाटंजी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत कर्मचारी सुरेश गेडाम यांचा मुलगा असून तो आपला भाऊ अण्णा याच्यासोबत ठेकेदारीची कामे करत असे, तर नितीन हा सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास गेडाम यांचा मुलगा आहे.
पृथ्वीराजच्या आई व भावाने केली होती आत्महत्या
सोमवारी घडलेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या पृथ्वीराजच्या कुटुंबाची कहानीच विदारक आहे. त्याने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेतले होते. त्याचे वडील चरणदास गेडाम हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. पृथ्वीराजचा मोठा भाऊ नागेश हा एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरीला होता. परंतु त्याला संस्थेने कामावरून काढल्याने नैराश्य येऊन त्याने दीड वर्षापूर्वीच आत्महत्या केली होती. तत्पूर्वी त्याच्या आईनेदेखील विहीरीत उडी घेऊन आत्महत्या केली. गेडाम कुटुंब अशा दु:खद घटनांचा सामना करीत असताना आता पृथ्वीराजचा नदीत बुडून करूण अंत झाला.