यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 12:28 PM2019-09-24T12:28:39+5:302019-09-24T12:29:14+5:30

सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

Resignation of Board of Directors of Vasant Sugar Factory in Yavatmal District | यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

यवतमाळ जिल्ह्यातील वसंत साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचा राजीनामा

googlenewsNext
ठळक मुद्देपुनर्गठनाचे शासन स्तरावर केलेले प्रयत्न निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : सुमारे १२० कोटींचे कर्ज असलेल्या उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने राजीनामा दिला आहे. यामुळे सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.
पाच तालुक्यांत विस्तार असलेल्या पोफाळी येथील वसंत सहकारी साखर कारखान्याचे चाक मागील तीन हंगामापासून फिरले नाही. त्यामुळे सहकारी तत्वावर चालणारा विदर्भातील एकमेव साखर कारखाना ही वसंतची ओळख आता मिटली आहे. तीन वर्षांपूर्वी २०१६ मध्ये शेतकरी सभासदांनी सर्व राजकीय मतभेद बाजूला सारुन अविरोधपणे संचालक मंडळाची निवड केली होती. त्यानंतर कारखाना अध्यक्ष व माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागी भाजपचे अ‍ॅड.माधवराव माने यांची वर्णी लागली होती. भाजप सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष असल्याने अ‍ॅड.माने यांनी कारखान्याच्या भवितव्यासाठी अनेक प्रयत्न केले. सर्वपक्षीय संचालक मंडळाने देखील त्यांना सहकार्य केले. मात्र कारखाना सुरू होऊ शकला नाही.
१२० कोटींपैकी बँकेच्या २० कोटींच्या कर्जाचे पुनर्गठन करण्यासाठी संचालक मंडळाने सहकार मंत्र्यांशीही चर्चा केली. मुंबईला जाऊन या कर्जाचे पुनर्गठन करण्याची मागणी केली. सहकार मंत्र्यांनी या कर्जमुक्तीचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार कारखान्यातर्फे १५ ऑगस्ट रोजी कर्जमाफीचा प्रस्ताव शासनाकडे दाखल केला. मात्र त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर झाल्यामुळे आगामी हंगामात कारखाना सुरू होण्याच्या सर्व शक्यता मावळल्या. त्यामुळे कारखान्याचे अध्यक्ष अ‍ॅड.माधवराव माने, उपाध्यक्ष कृष्णा देवसरकर व सर्व संचालकांनी आपले राजीनामे कार्यकारी संचालक अरूण भालेराव यांच्याकडे सोपविले. आता कारखान्यावर प्रशासक मंडळाची नेमणूक होण्याची शक्यता आहे. कारखाना सुरू होणार नसल्याने त्याचे पडसाद या विधानसभा निवडणुकीत उमटण्याची शक्यता राजकीय गोटात वर्तविली जाते.

युती सरकार शेतकरी विरोधी - माने
कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन न करणारे राज्यातील भाजप-शिवसेनेचे युती सरकार शेतकरी विरोधी आहे, असा आरोप कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपच्या सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. माधवराव माने यांनी करून भाजपला घरचा अहेर दिला आहे. सरकारच्या या निर्णयाने आम्ही हताश झालो अशी प्रतिक्रिया माने यांनी नोंदविली.

Web Title: Resignation of Board of Directors of Vasant Sugar Factory in Yavatmal District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.