‘वसंत’च्या अध्यक्षांचा राजीनामा

By admin | Published: May 20, 2017 02:36 AM2017-05-20T02:36:20+5:302017-05-20T02:36:20+5:30

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्षभरापूर्वी अविरोध

The resignation of the President of 'Vasant' | ‘वसंत’च्या अध्यक्षांचा राजीनामा

‘वसंत’च्या अध्यक्षांचा राजीनामा

Next

वाद चव्हाट्यावर : साखर कारखाना मोजतोय अखेरच्या घटका
लोकमत न्यूज नेटवर्क
उमरखेड : सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र बसून वसंत सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी वर्षभरापूर्वी अविरोध निवडलेल्या माधवराव पाटील जवळगावकर यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. संचालक मंडळात अंतर्गत धुसफूस काही दिवसांपासून सुरू होती. त्याचे रूपांतर अध्यक्षांच्या राजीनाम्यात झाले. आधीच कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक असून या राजीनामाप्रकरणाने कारखान्यावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे वसंत सहकारी साखर कारखाना आहे. गत काही वर्षात या कारखान्याची आर्थिक स्थिती नाजूक झाली आहे. गतवर्षी कारखान्याच्या आर्थिक स्थितीला पुढे करत सर्वपक्षीय नेते एकत्र आले. पुसद अर्बन बँकेच्या सभागृहात माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी आजी-माजी आमदारांची सर्वपक्षीय बैठक घेतली. या बैठकीत कारखान्याच्या हितासाठी संचालक मंडळ अविरोध निवडण्याचा निर्णय झाला. सर्वानुमते हदगावचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांची अध्यक्षपदी तर माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकरांचे बंधू कृष्णा पाटील देवसरकरांची उपाध्यक्षपदी निवड केली. त्यावेळी माजी आमदार अ‍ॅड.अनंतराव देवसरकर गट, प्रकाश पाटील देवसरकर गट आणि आमदार मनोहरराव नाईक गटाचे प्रत्येकी तीन संचालक तर माधवराव पाटील एक, बापुराव पाटील एक, विजयराव खडसे एक अशा १५ जणांचे संचालक मंडळ निवडल्या गेले. तर चार जागा अध्यक्ष माधवराव जवळगावकर यांनी घ्यायचे, असे ठरले. वसंत कारखाना वाचला पाहिजे, या हेतूने सर्वांनी अविरोध निवड केली.
परंतु गत काही दिवसांपासून अंतर्गत हेवेदावे पुढे येवू लागले. कारखान्याचे अध्यक्ष माधवराव पाटील अनेक बैठकांना उपस्थित राहात नव्हते. त्यांच्या विरोधात संचालकमंडळ गेले. त्यातच कामगारांचे पगार नाही, ऊस उत्पादकांचे बिल थकीत आहे. ५०० कामगारांना अर्धपगारी रजेवर पाठविले आहे, तर दोन वर्षांपासून थकीत वीज बिलाने कामगार वसाहतीचा पुरवठा खंडित केला आहे. एवढेच नाही तर पाच लाखांचे पितळ चोरीप्रकरण उघडकीस आले होते.
दुसरीकडे अध्यक्षांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू होती. त्यासाठी पुसदमध्ये तीन बैठका झाल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, सर्वच संचालकांनी अध्यक्ष बदलण्यासाठी हिरवी झेंडी दिली असल्याची चर्चा होती. या सर्व प्रकारामुळे १८ मे रोजी अध्यक्ष माधवराव पाटील जवळगावकर यांनी आपला राजीनामा दिला. सदर राजीनामा कार्यकारी संचालक राजेंद्र खडप यांच्या सुपूर्द करण्यात आला. अध्यक्षांनी दिलेल्या या राजीनाम्याने एकच खळबळ उडाली आहे.

Web Title: The resignation of the President of 'Vasant'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.