सण-उत्सवात तंटामुक्त गाव समित्यांची जबाबदारी वाढणार
By admin | Published: September 5, 2016 01:05 AM2016-09-05T01:05:16+5:302016-09-05T01:05:16+5:30
सप्टेंबर ते नोव्हेंबर हा तीन महिन्याचा कालावधी सण उत्सवाचा कालावधी आहे. पोळा शेतकऱ्यांच्या सणाने याची सुरूवात होत आहे.
सहकार्याची गरज : प्रतिबंधात्मक उपाययोजना आवश्यक
वणी : सप्टेंबर ते नोव्हेंबर हा तीन महिन्याचा कालावधी सण उत्सवाचा कालावधी आहे. पोळा शेतकऱ्यांच्या सणाने याची सुरूवात होत आहे. गावात बहुतांश वाद-विवादही याच काळात निर्माण होतात. सण-उत्सवच तंट्याचे उगमस्थान मानले जाते. त्यामुळे गावातील तंटामुक्त समित्यांनाही हा तीन महिन्याचा कालावधी कस लावणारा असतो. तंटामुक्त समित्यांनी गावात तंटे निर्माणच होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय केले, तर निश्चितच गावात शांतता प्रस्थापीत होवू शकते.
सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात पोळा, गणेशोत्सव, बकरी ईद, गौरी पूजन, दसरा, मोहरम, दुर्गोत्सव, दिवाळी, कार्तिकी यात्रा हे प्रमुख सण येत आहे. विविध धर्मियांचे हे सण उत्सव नागरिक आपापल्या रितीरिवाजाने साजरे करतात. परंतु कधी-कधी लहानशी ठिणगी पाडण्याचे काम समाज विघातक व्यक्तीकडून होते. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण करून आपली पोळी शेकून घेणारी दृष्ट प्रवृत्तीही समाजात असतात. याकडे तंटामुक्त समित्यांनी सतर्क राहून लक्ष ठेवले पाहिजे. प्रत्येक गावात तंटामुक्त समित्यांची स्थापना झाली आहे.
समितीमध्ये चरित्र्यवान व कर्तृत्ववान लोकांचाच समावेश असावा, असे शासनाचे निर्देश आहे. मात्र काही ठिकाणी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष निवडतानाच ग्रामसभेत वादावादी सुरू होते. हे महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम मोहिमेचे अपयश आहे. नवनियुक्त अध्यक्ष व सदस्यांनीही स्वत:ला समाजसेवक म्हणून गावासाठी कार्य करण्याचा संकल्प केला, तर गावकरीही अशाा पदाधिकाऱ्यांना पाठींबा देतात, हे अनेक गावांनी दाखवून दिले आहे. सण-उत्सव साजरे करताना जातीय मतभेद विसरून जर एकमेकांच्या सण-उत्सवात सर्वांनी सहभाग घेतला, तर जातीय सलोखा निर्माण होतो. यासाठी तंटामुक्त समितीने प्रयत्न करणे गरजेचे आहे. सण-उत्सवाच्या काळात विविध सामाजिक उपक्रम गावात घ्यावेत.
समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा गावातून हद्दपार करण्यासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन, प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवाणी गावकऱ्यांना दिल्यास दृष्टाचेही मतपरीवर्तन होऊ शकते, असे अनुभव आहेत. यासाठी गावात अवध्ौ धंदे, दारूंचा शिरकाव होऊ न देणे, हे कार्य समित्यांना प्राधान्याने करावे लागणार आहे. आवश्यक वाटल्यास यासाठी पोलिसांची मदत घ्यावी. गावातून अवैैध धंद्यांचे निर्मूलन झाले, तर ७० टक्के समितीचे कार्य सफल झाले, असे समजावे.
देशात ग्रामराज्य निर्माण व्हावे, हे महात्मा गांधीजींचे स्वप्न होते. म्हणूनच शासनाने तंटामुक्त मोहिमेलाही त्यांचे नाव दिले. त्यांचे स्वप्न साकार करण्याचे कार्य राज्यातील हजारो गावच्या तंटामुक्त समित्या निश्चितच करू शकतात.
सतर्क राहून प्रतिबंधात्मक उपाययोजना करूनही शेजाऱ्यांमध्ये, कुटुंबामध्ये संपली. अतिक्रमणे यावरून वाद होऊ शकतात. तेव्हा तंटामुक्त समित्यांनी ग्राम न्यायालयाची भूमिका पार पाडून असे तंटे पोलीस ठाण्याच्या दारापर्यंत न जाता गावातच समेटाने मिटविण्याचा प्रयत्न करणे, मोहिमेत अपेक्षीत आहे. पोलीस ठाण्यात वाळल्यासोबत ओलेही जळते.
हा सर्वांचाच अनुभव आहे. मग तंटा क्षुल्लक असला तरी त्यामध्ये वेळ, पैैसा, प्रतिष्ठांचा चुराडा होतो. जेव्हा आपण एखाद्याची जीरवण्याच्या उद्देशाने ठाण्याची पायरी गाठतो. तेव्हा त्याच्यासोबत आपली जिरते, हे तंटामुक्त समित्यांनी तक्रारकर्त्यांच्या लक्षात आणून दिले. तर बहुतांश तंटे माघारी फिरतात, हे अनेक गावांनी तंटामुक्त होऊन दाखवून दिले आहे. एवढेच नव्हे तर मिळणाऱ्या बक्षिसातून गावात काहीतरी विकासात्मक पाऊल उचलून गावाला सन्मान मिळवून देता येतो. (स्थानिक प्रतिनिधी)