अयोध्येतील राम मंदिराच्या धर्तीवर सीता मंदिराचा जीर्णोद्धार; राळेगाव येथील सभेत देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन
By विशाल सोनटक्के | Published: April 21, 2024 09:51 PM2024-04-21T21:51:05+5:302024-04-21T21:51:57+5:30
देशातील एकमेव असलेल्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सीता मंदिराचा विकास करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिली. ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
यवतमाळ : अयोध्येत राम मंदिराचा ज्याप्रमाणे जीर्णोद्धार झाला, त्याच धर्तीवर देशातील एकमेव असलेल्या राळेगाव तालुक्यातील रावेरी येथील सीता मंदिराचा विकास करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी रात्री दिली. ते यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ राळेगाव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.
कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आज कमी भाव मिळाला असला, तरी पुढील काळात दरामधील तफावत भरून काढली जाईल. आचारसंहिता संपताच रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. पुढील कार्यकाळ महिला बचत गटाचा राहील. महिलांचे बचतगट अधिक सक्षम करण्यासाठी देशातील महिलांना उद्योजक बनविण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक आदी महत्त्वाच्या ठिकाणी महिलांच्या बचत गटांना उद्योगासाठी संधी दिली जाईल, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचेही यावेळी भाषण झाले. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांनी आपल्या भाषणात रावेरीतील सीता मंदिराचा जीर्णोद्धार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचे सांगितले. सभेचे प्रास्ताविक आमदार प्राचार्य डॉ. अशोक उईके यांनी केले, तर सूत्रसंचालन स्वप्नील राऊत यांनी केले. यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार डॉ. संदीप धुर्वे, रमेश अगरवाल, वसंत घुईखेडकर, तारेंद्र बोर्डे, हरिहर लिंगनवार, पराग पिंपळे, देवा चव्हाण, राजू उंबरकर, कीर्ती काकडे, चित्तरंजन कोल्हे, प्रफुल्ल चव्हाण, मनोज भोयर, डॉ. कुणाल भोयर, संतोष कोकुलवार, किशोर जुनुनकर आदी उपस्थित होते.
माहेर अन् सासर दोन्ही घरे महिलांची
राजश्री पाटील या बाहेरच्या नाहीत. त्यांचे माहेर यवतमाळ जिल्ह्यातील आहे. नेहमी माहेरवासीयांचे लक्ष आपल्या माहेरकडील लोकांकडे असते. त्यामुळे राजश्री पाटील यांचे लक्ष यवतमाळ जिल्ह्याकडे अधिक राहील, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर खरपूस टीका केली. आघाडीवाले बारामतीमध्ये सुनेला, तर यवतमाळमध्ये लेकीला बाहेरची म्हणतात, असे कसे चालेल. महिला उमेदवाराच्या बाबतीत माहेर आणि सासर असा भेद व्हायला नको, ही दोन्ही घरे तिचीच असल्याचेही त्यांनी सांगितले.
उदय सामंत यांच्या कारची काच फुटली
राळेगाव येथील सभेसाठी उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित होते. सभा संपल्यानंतर ते आपल्या कारकडे गेले. त्यावेळी त्यांना त्यांच्या कारची काच फुटली असल्याचे लक्षात आले. हा प्रकार नेमका कोणी केला, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.