महाविकास आघाडीचा रिझल्ट जिल्हा परिषदेत मिळाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 06:00 AM2020-01-15T06:00:00+5:302020-01-15T06:00:10+5:30
भाजपची पाच वर्ष राज्यात सत्ता होती. मात्र त्यांना शेवटपर्यंत विधान परिषदेसाठी उमेदवार शोधावा लागला. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराला भाजपने रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून स्थानिकचा मुद्दा जरी केला जात असेल, मात्र त्यांनी नाकारलेला उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात उभा केल्याचे ना. राऊत यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने मिळून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थेतही महाविकास आघाडीनेच आघाडी घेतली आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीत आघाडीचे वर्चस्व राहिले आहे. याचे परिणाम होऊ घातलेल्या विधान परिषद निवडणुकीतही दिसतील. आमचाच विजय होईल, असा विश्वास ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
भाजपची पाच वर्ष राज्यात सत्ता होती. मात्र त्यांना शेवटपर्यंत विधान परिषदेसाठी उमेदवार शोधावा लागला. त्यांच्याकडे उमेदवार नाहीत, त्यामुळेच महाविकास आघाडीच्या उमेदवारीसाठी प्रतीक्षेत असलेल्या उमेदवाराला भाजपने रिंगणात उतरविले आहे. भाजपकडून स्थानिकचा मुद्दा जरी केला जात असेल, मात्र त्यांनी नाकारलेला उमेदवार महाविकास आघाडीच्या उमेदवाराविरोधात उभा केल्याचे ना. राऊत यांनी सांगितले. नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात प्रामुख्याने विदर्भातील स्थानिक मुद्यावर निर्णय घेण्यात आले. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांचे प्रश्न, राज्याचे प्रश्न याकडे लक्ष वेधले आहे. ऊर्जामंत्री म्हणून सर्वांनाच ऊर्जा देण्याची जबाबदारी माझ्याकडे आहे. शेतकऱ्यांना नियमित वीज पुरवठा व कृषीपंप जोडणीचे काम तातडीने पूर्ण केले जाईल, असे ना. नितीन राऊत यांनी सांगितले. यावेळी खासदार बाळू धानोरकर, आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विधान परिषदेचे माजी उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मंत्री अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, माजी आमदार वामनराव कासावार, विजय खडसे, कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या सचिव संध्याताई सव्वालाखे, जीवन पाटील, प्रकाश मानकर आदी उपस्थित होते.
सूर्याला दिवा दाखविण्याचा प्रकार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तुलना करणे म्हणजे सूर्याला दिवा दाखविण्यासारखे आहे. बहुजनांचे नेतृत्व असलेल्या छत्रपतींनी अठरापगड जातीच्या सर्वांगीण विकासासाठी स्वराज्याची निर्मिती केली. अशा महामानवासोबत नरेंद्र मोदींची तुलना करणाºयांचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया ना. नितीन राऊत यांनी दिली.