जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2019 09:27 PM2019-06-08T21:27:46+5:302019-06-08T21:28:20+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल केवळ ६६.२० टक्के लागला असून शिक्षण विभागातील उदासीन यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे.

The result of the district is only 66 percent | जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के

जिल्ह्याचा निकाल केवळ ६६ टक्के

Next
ठळक मुद्देदहावी परीक्षेत शिक्षण विभाग ‘वरपास’ । दिग्रसची रेणू भगत ९९.४० टक्के गुणांसह जिल्ह्यात अव्वल

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाईन जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल केवळ ६६.२० टक्के लागला असून शिक्षण विभागातील उदासीन यंत्रणेचे पितळ उघडे पडले आहे. केवळ ६०.१९ टक्के मुले उत्तीर्ण होऊ शकली. तर या पडझडीतही मुलींनी मात्र बाजी मारली. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७२.८६ आहे. दिग्रस येथील रेणू संजय भगत ही विद्यार्थिनी ९९.४० गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल तर यवतमाळ येथील तनय संजय वानखडे हा विद्यार्थी ९९.२० टक्के गुण घेत जिल्ह्यात दुसरा ठरला आहे.
यंदा दहावीच्या परीक्षेत जिल्ह्यातून ३८ हजार ३२५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी २५ हजार ३७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या २० हजार १५३ मुलांपैकी १२ हजार १३१ मुले पास झाली आहे. त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ६०.१९ आहे. त्याचवेळी १८ हजार १७२ मुलींनी यंदा दहावीची परीक्षा दिली. त्यापैकी १३ हजार २४० म्हणजे ७२.८६ टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. मुले आणि मुलींच्या यशाचे टक्केवारीमध्ये तब्बल १२ टक्क्यांची तफावत आहे. जिल्ह्यातून तीन हजार ७९४ विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणी प्राप्त केली आहे. तर नऊ हजार ४०६ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे. याशिवाय दहा हजार १५ विद्यार्थी द्वितीय आणि दोन हजार १०१ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण होऊ शकले. जिल्ह्यात अव्वल ठरलेल्या रेणू संजय भगत हिला ५०० पैकी ४९० गुण मिळाले असून कला, क्रीडाचे सात अतिरिक्त गुण मिळाले आहे. तर तनय संजय वानखडे याला ४८६ गुण मिळाले असून कला, क्रीडाचे दहा अतिरिक्त गुण मिळाले आहे. तर जायन्टस् इंग्लिश मीडियम स्कूलची समीक्षा ज्ञानेश्वर खेरडे हिने ९८.२० टक्के गुण मिळविले. तिला संस्कृत विषयात १०० पैकी १०० गुण आहे.

रेणूला व्हायचेय आयटी इंजिनिअर
यवतमाळ : इयत्ता दहावीच्या परीक्षेत दिग्रस येथील रेणू संजय भगत ही विद्यार्थिनी ९९.४० टक्के गुण घेऊन जिल्ह्यात अव्वल ठरली आहे. तिला ४९० गुण मिळाले आहे. दिग्रस येथील मोहनाबाई कन्या शाळेची विद्यार्थिनी आहे. यापुढे आयटी इंजिनिअर होण्याचे आपले स्वप्न आहे, असे रेणूने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. सध्या रेणू जेईई परीक्षेची तयारी करण्यासाठी हैदराबाद येथे आहे. दहावीचा निकाल येताच आईवडिलांनी फोन करून तिचे अभिनंदन केले. रेणूचे वडील संजय भगत हे जोगलदरी येथील जिल्हा परिषद शाळेत सहायक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तर आई शारदा गृहिणी आहे. भगत कुटुंब दिग्रस तालुक्यातील तिवरी या खेड्यातील मूळ रहिवासी आहे. रेणू अभ्यासासोबतच अनेक गोष्टींमध्ये रुची बाळगते. व्हॉलिबॉल खेळणे तिला आवडते. सांस्कृतिक कार्यक्रमातही हिरीरीने भाग घेणारी रेणू ‘आॅलराउंडर’ असल्याचे वडील संजय भगत म्हणाले. मात्र दहावीत येताच तिने इतर सर्व गोष्टी बाजूला ठेवून अभ्यासावर फोकस केला होता. ‘सेल्फ स्टडी’वरच तिचा भर राहिला. ती आधीपासूनच शाळेत टॉपर राहिली. आता जिल्ह्यातही टॉपर ठरली आहे.

जिल्ह्याचा निकाल १८ टक्क्यांनी घटला
दहावीच्या परीक्षेत यंदा जिल्ह्याचा निकाल गतवर्षीच्या तुलनेत तब्बल १८ टक्क्यांनी घटला आहे. २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात जिल्ह्याचा दहावीचा निकाल ८३.९९ टक्के एवढा लागला होता. परंतु शनिवारी जाहीर झालेल्या शैक्षणिक सत्र २०१८-१९ च्या निकालाची टक्केवारी अवघी ६६.२० एवढी नोंदविली गेली. वर्षभरात दहावीचा निकाल सुमारे १८ टक्क्यांनी घटला. यावर्षी गणित आणि विज्ञान हे दोन विषय वगळता इतर विषयांचे प्रात्यक्षिकाचे गुण बंद करण्यात आल्यामुळे जिल्ह्याचा निकाल तब्बल १८ टक्क्यांनी घसरल्याचे शिक्षण विभागातून सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या सरावाकडे दुर्लक्ष केल्यामुळे निकाल घसरल्याची माहिती शिक्षण विभागातीलच एका अधिकाऱ्याने सांगितली.
 

Web Title: The result of the district is only 66 percent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.