प्रत्येक फेरीचा निकाल उत्साह वाढवित गेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 11:04 PM2019-05-23T23:04:35+5:302019-05-23T23:05:59+5:30
शिवसेनेच्या कार्यालयात बुधवारपासूनच चहलपहल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी वाशिमवरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शिवसेनेच्या कार्यालयात बुधवारपासूनच चहलपहल असल्याचे चित्र पाहायला मिळाले. या ठिकाणी वाशिमवरून येणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी निवासाची व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. यासोबतच मतमोजणी केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांचीही व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा मुक्काम होता, त्या ठिकाणी शामियाना टाकण्यात आला होता.
गुरुवारी पहाटेपासून या ठिकाणी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होती. प्रारंभी मतमोजणी केंद्रांवर ही गर्दी पाहायला मिळाली. प्रत्येक फेरीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांची गर्दी कार्यालयासोबत मतमोजणी केंद्रावरही वाढण्यास सुरुवात झाली. दुपारनंतर भावना गवळींच्या निवासस्थानी चाहत्यांची प्रचंड गर्दी झाली होती. गुरुवारीच भावना गवळी यांचा वाढदिवसही होता. यासोबत त्या जास्त मतांनी निवडून येईल, अशा मतमोजणी फेºया जाहीर होत होत्या. यामुळे कार्यकर्त्यांनी भावना गवळी यांना फुलांचे गुलदस्ते भेट म्हणून देण्यास सुरूवात केली. यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी आमच्याकडून वाढदिवसाची ही विजयी भेट असल्याची प्रतिक्रिया भावना गवळींपुढे व्यक्त केली. गवळी यांच्या विजयाचे गणित लक्षात येताच जिल्हाभरातून गवळी यांना सतत फोन येत होते. सायंकाळी विजयी मिरवणूक काढण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली. गवळी यांच्या निवासस्थानापासून ते मतमोजणी कार्यालयापर्यंत ही मिरवणूक पाहायला मिळाली. कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह असून त्यांनी भावना गवळींच्या विजयाच्या जयघोषासोबत ‘जय भवानी जय शिवाजी’ असे नारेही दिले. यावेळी गवळी यांनी कार्यकर्त्यांकडून विजयाच्या शुभेच्छा स्वीकारल्या.
गवळी यांच्या वाढदिवसामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिठाई आणण्यात आली होती. येणाºया प्रत्येक कार्यकर्त्याला आणि शुभचिंतकांना ही मिठाई दिली जात होती.
शहरातील विविध भागातून आलेल्या महिलांनी पुष्पगुच्छ देऊन भावना गवळी यांचे अभिष्टचिंतन केले. आमच्या मनातला उमेदवार पुन्हा निवडून आला, असे मत महिलांनी यावेळी व्यक्त केले.
प्रत्येक फेरीच्या मतांबाबत थेट ‘मातोश्री’वरून विचारणा
मतमोजणी केंद्रावर प्रत्येक फेरीला भावना गवळी यांचे मताधिक्य वाढत होते. प्रत्येक फेरीचे मत थेट पक्षाच्या मुंबई कार्यालयातून उमेदवाराला विचारले जात होते. हे मताधिक्य ४८ हजारांवर पोहोचताच भावना गवळी यांच्या निवासस्थानापुढे कार्यकर्त्यांची गर्दी वाढण्यास सुरूवात झाली. सायंकाळपर्यंत या ठिकाणी मोठी गर्दी जमली. आणि कार्यकर्त्यांनी आपला जल्लोष साजरा करण्यास सुरूवात केली. या जल्लोषाचे रूपांतर विजयी रॅलीमध्ये झाले.