इंधन दरवाढीचा परिणाम, पेट्रोलसाठी महाराष्ट्रातील वाहने थेट तेलंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 05:00 AM2021-02-25T05:00:00+5:302021-02-25T05:00:02+5:30
नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर पिंपरवाडा हे तेलंगणातील पहिले गाव, तेथे पेट्रोलचे दर ९६ रुपये ५६ पैसे, तर डिझेलचे दर ९० रुपये ५७ पैसे आहेत. तेलंगणाकडून महाराष्ट्राकडे येताना पाटणबोरी हे पहिले गाव आहे. तेथे पेट्रोलचे दर ९८ रुपये १४ पैसे, तर डिझेलचा दर ८७ रुपये ९० पैसे इतका आहे. अर्थात, तेलंगणात महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल २ रुपये ४२ पैसे स्वस्त आहे, तर तेलंगणाच्या तुलनेत महाराष्ट्रात डिझेल दोन रुपये ६७ पैसे एवढे स्वस्त आहे.
नीलेश यमसनवार
लोकमत न्यूज नेटवर्क
पाटणबोरी : पेट्रोल-डिझेलच्या किमती सामान्यांच्या दृष्टीने गगणाला भिडल्या आहेत, अशा स्थितीत स्वस्तात पेट्रोल मिळत असेल, तर वाहनधारक दुसऱ्या राज्यातही ते भरून घेण्यासाठी जातात. महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर पेट्रोल-डिझेलमधील दराच्या तफावतीमुळे वाहनांची ही ये-जा केवळ पैसे वाचविण्यासाठी होत असल्याचे चित्र पाहायला मिळते. तेलंगणात पेट्रोलचा दर दोन रुपये प्रति लीटर कमी असल्याने, महाराष्ट्र सीमेतील वाहने तेथे केवळ पेट्रोल भरण्यासाठी जातात, तर डिझेलचा दर अडीच रुपयापेक्षा कमी असल्याने तेलंगणातील वाहने डिझेल खरेदीसाठी महाराष्ट्रात येतात. हा बदल इतरांसाठी आश्चर्यकारक व अविश्वसनीय असला, तरी स्थानिकांसाठी हा विषय रूटीन आहे.
महाराष्ट्रात पांढरकवडा तालुक्यातील पाटणबोरीपासून पाच किलोमीटर पुढे पैनगंगा नदी ओलांडल्यानंतर तेलंगणा राज्याची सीमा सुरू होते. नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र.७ वर पिंपरवाडा हे तेलंगणातील पहिले गाव, तेथे पेट्रोलचे दर ९६ रुपये ५६ पैसे, तर डिझेलचे दर ९० रुपये ५७ पैसे आहेत. तेलंगणाकडून महाराष्ट्राकडे येताना पाटणबोरी हे पहिले गाव आहे. तेथे पेट्रोलचे दर ९८ रुपये १४ पैसे, तर डिझेलचा दर ८७ रुपये ९० पैसे इतका आहे. अर्थात, तेलंगणात महाराष्ट्राच्या तुलनेत पेट्रोल २ रुपये ४२ पैसे स्वस्त आहे, तर तेलंगणाच्या तुलनेत महाराष्ट्रात डिझेल दोन रुपये ६७ पैसे एवढे स्वस्त आहे. त्यामुळे पाटणबोरी परिसरातील नागरिक स्वस्त पेट्रोल भरण्यासाठी तेलंगाणात जातात, तर तेलंगणातील जड वाहनधारक डिझेल भरण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेत येत असल्याचे चित्र आहेत. जड वाहने एकाच वेळी २०० ते ३०० लीटर डिझेल भरत असल्याने, त्यांचा दर तफावतीमुळे मोठा फायदा होतो. महाराष्ट्राच्या सीमेतून जड वाहनांच्या इंधनाच्या टाक्या फुल करायच्या आणि मग परत तेलंगाणात निघून जायचे, असा या वाहनधारकांचा जणू दिनक्रमच बनला आहे. याच कारणाने की काय, पाटणबोरी येथील एक पेट्रोल पंप गेल्या तीन वर्षांपासून अमरावती विभागात सर्वाधिक डिझेल विक्रीचा बहुमान मिळवित आहे. या पेट्रोल पंपाचा दररोजची सरासरी डिझेल विक्री २० हजार लीटरची असून, पेट्रोलची विक्री केवळ एक हजार लीटर आहे, तर महाराष्ट्रात येणारी वाहने तेलंगणातूनच स्वस्त पेट्रोल भरून एन्ट्री करतात.
१ मे, २०२० पासून महाराष्ट्र सरकारने पेट्रोल व डिझेलमागे प्रती लीटर तीन रुपयांची दरवाढ केली. त्यापूर्वी डिझेल तेलंगणापेक्षा महाराष्ट्रात प्रति लीटर पाच रुपयांनी स्वस्त होते. भाजप-शिवसेना सरकारमध्ये तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केल्याने राज्यात इंधनाच्या किमती कमी झाल्या होत्या. त्यामुळे राज्यात इंधनाची विक्री दुप्पटीने होऊन महसुलातही भर पडली होती.
महाराष्ट्रात सिमेंट स्वस्त तर तेलंगणात लोखंड, तेल, नारळ स्वस्तात
केवळ इंधन दराच्याच तफावतीवरून महाराष्ट्र व तेलंगणात खरेदीसाठी ये-जा होत नाही, तर इतरही वस्तूतील फरक नागरिकांना राज्याच्या सीमा ओलांडण्यास भाग पाडतात. महाराष्ट्रात प्रत्येक सिमेंट बॅगवर ३० रुपये वाचतात. म्हणून तेलंगणातील बांधकाम कंत्राटदार व नागरिकही महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात सिमेंटची खरेदी करतात. या उलट तेलंगणात लोखंडामध्ये प्रति क्विंटल ३०० रुपये दर कमी आहे. नामांकित कंपन्यांचे तेल, आटा, नारळ, कापड, मसाले याचे भाव तेलंगणात स्वस्त असल्याने, नागरिक महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून तेलंगणात या साहित्याच्या खरेदीसाठी पसंती दर्शवितात. व्यापारी वर्गांनाही याचा मोठा फायदा होतो. दोन्हीकडील व्यापारी दराच्या तफावतीचा फायदा उचलत ट्रकचे ट्रक माल बोलवित असल्याची माहिती आहे.