शिरपूरमध्ये विसर्जित रोपांचे पुन्हा रोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2018 09:38 PM2018-11-10T21:38:27+5:302018-11-10T21:39:15+5:30

बेजबाबदारपणामुळे सुकलेली रोपे तलावात फेकून दिल्याच्या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच, शनिवारी शिरपूर ग्रामपंचायतने पुन्हा एक नवा प्रताप केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश येताच, तलावात फेकलेली रोपे शनिवारी सकाळी पुन्हा उचलून गावात मिळेल त्या ठिकाणी त्याचे रोपण केले.

Resurrecting of dissolved seedlings in Shirpur | शिरपूरमध्ये विसर्जित रोपांचे पुन्हा रोपण

शिरपूरमध्ये विसर्जित रोपांचे पुन्हा रोपण

googlenewsNext
ठळक मुद्देबीडीओंकडून चौकशीचे आदेश : ग्रामपंचायतचा नवा प्रताप

लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : बेजबाबदारपणामुळे सुकलेली रोपे तलावात फेकून दिल्याच्या घटनेचे वृत्त ‘लोकमत’मध्ये झळकताच, शनिवारी शिरपूर ग्रामपंचायतने पुन्हा एक नवा प्रताप केला. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश येताच, तलावात फेकलेली रोपे शनिवारी सकाळी पुन्हा उचलून गावात मिळेल त्या ठिकाणी त्याचे रोपण केले. या प्रकरणात चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, गटविकास अधिकारी राजेश गायनर व महसूल विभागाचे काही अधिकारी महत्त्वाच्या बैठकीसाठी शिरपूरमध्ये येणार असल्याची कुणकुण लागताच, शिरपूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी ६ नोव्हेंबरच्या भल्या पहाटे ग्रामपंचायतीच्या खोलीत सुकलेल्या अवस्थेत ठेऊन असलेली ३०० पेक्षा अधिक रोपे गावालगतच्या तलावात नेऊन फेकली. काही जागरूक नागरिकांना हा संतापजनक प्रकार कळल्यानंतर त्यांनी हा सारा घटनाक्रम आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. शनिवारी यासंदर्भात ‘लोकमत’ने ठळक वृत्त प्रकाशित करताच, शिरपूर ग्रामपंचायतीचे प्रशासन हादरून गेले. कारवाईच्या भीतीने ६ नोव्हेंबरला तलावात फेकून देण्यात आलेली ही रोपे शनिवारी सकाळी तेथून पुन्हा उचलून त्याचे शिरपूर परिसरात मिळेल त्या जागी घाईगडबडीने रोपण करण्यात आले. हा प्रकारदेखिल जागरूक नागरिकांनी आपल्या कॅमेºयात कैद केला. या ग्रामपंचायतीला एक हजार रोपे लावण्याचे उद्दीष्ट देण्यात आले होते. परंतु याविषयात कायम अनास्था असलेल्या शिरपूर ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ कागदी घोडे नाचवत वृक्षारोपण केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात या रोपांची काय स्थिती आहे, याची खबरबातदेखिल या पदाधिकाºयांना नाही. शुक्रवारी या विषयात ‘लोकमत’ने सरपंच मिनाक्षी कनाके यांना विचारणा केली असता, केवळ आकड्यांची गणिते सांगून त्यांनी स्वत:च्या बेजबाबदारपणाचे प्रदर्शन केले. शासनाकडून आलेल्या योजना ग्रामपंचायतींकडून किती प्रामाणिकपणे राबविल्या जातात, याचा प्रत्यय या घटनेने आला.
विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविली चौकशी
शनिवारी ‘लोकमत’ने यासंदर्भात वृत्त प्रकाशित करताच, वणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी राजेश गायनर यांनी विस्तार अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना विभागाला यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारपासून या प्रकरणाच्या चौकशीला प्रारंभ होणार असून त्याचा अहवाल तीन दिवसांच्या आत सादर करावयाचा आहे.

शिरपूर ग्रामपंचायतीने केलेला हा प्रकार अतिशय गंभीर असून त्याची चौकशी केली जात आहे. या चौकशीत जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कारवाई करण्याची शिफारस वरिष्ठांकडे केली जाईल.
- राजेश गायनर,
गटविकास अधिकारी वणी.

Web Title: Resurrecting of dissolved seedlings in Shirpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.