सेवानिवृत्त पालिका कर्मचारी सातव्या वेतन आयोगापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2021 04:45 AM2021-08-27T04:45:23+5:302021-08-27T04:45:23+5:30
पुसद : सेवानिवृत्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना वेळेत शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश आहे. मात्र, तब्बल पाच वर्षांपासून नगरपरिषदेच्या ...
पुसद : सेवानिवृत्त तसेच ज्येष्ठ नागरिकांना वेळेत शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे निर्देश आहे. मात्र, तब्बल पाच वर्षांपासून नगरपरिषदेच्या १४ सेवानिवृत्तांना सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम देण्यात आली नाही. यापैकी ३० टक्के कर्मचाऱ्यांचे आता निधन झाले आहे.
सातव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम शासन नियमानुसार नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडात जमा करण्याचे व त्यावरील व्याज देण्याचे निर्देश आहेत. मात्र, येथील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे फंडाचे खाते नसून नगरपरिषदेनेही त्यांचे स्वतंत्र खाते काढून त्यामध्ये रक्कम जमा केली नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांना देय असलेली सर्व रक्कम अर्थात पहिला व दुसरा हप्ता तत्काळ द्यावयास पाहिजे, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांपैकी ३० टक्के कर्मचाऱ्यांचे निधन झाले आहे. बहुतांश ज्येष्ठ कर्मचारी आजारपणाने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे औषधासाठी पैसे नसल्याने त्यांची कुचंबणा होत आहे. ही थकीत रक्कम त्वरित मिळावी, यासाठी सर्व सेवानिवृत्त कर्मचारी मागील दोन वर्षांपासून पालिकेच्या पायऱ्या झिजवत आहेत. आता थकीत रकमेचा पहिला व दुसरा, असे दोन हप्ते येत्या ६ सप्टेंबरपर्यंत देण्यात यावे, अशी मागणी अन्यायग्रस्त सेवानिवृत्तांनी निवेदनातून मुख्याधिकारी डॉ. किरण सुकलवाड यांच्याकडे केली आहे. निवेदनावर आर. एम. दिगलवार, एस. एस. गोरे, एन. एस. मोहेकर, व्ही. के. कान्हेड, अशोक उंटवाल, व्ही. ए. नरसिंग, सुधाकर बडवे, टी. एस. काळे, शोभा जाधव, शांता वाठोरे, विजया डांगे, पुष्पा कांबळे, जनाबाई गायकवाड, प्रकाश नकवाल, आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. रक्कम न मिळाल्यास त्यांनी ९ सप्टेंबरपासून पालिकेसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.