सेवानिवृत्तांनाही ७ वर्षांपासून लाभाची प्रतीक्षा, नगर परिषदेच्या ३० हजार कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 02:36 PM2021-02-17T14:36:28+5:302021-02-17T14:36:52+5:30

Yavatmal News : मागील काही वर्षांपासूनची वेतनातील अनियमितता त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या ठरत आहे.

Retirees are also waiting for benefits for 7 years, stagnant salaries of 30,000 employees of the Municipal Council | सेवानिवृत्तांनाही ७ वर्षांपासून लाभाची प्रतीक्षा, नगर परिषदेच्या ३० हजार कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन 

सेवानिवृत्तांनाही ७ वर्षांपासून लाभाची प्रतीक्षा, नगर परिषदेच्या ३० हजार कर्मचाऱ्यांचे रखडले वेतन 

Next

यवतमाळ - शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध करून दिला जात नसल्याने नगर परिषद आणि नगर पंचायतचे ३० हजारावर कर्मचारी आर्थिक अडचणीत आले आहे. मागील तीन महिन्यांपासून सफाई कामगार व पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही. शिवाय १२ हजार सेवानिवृत्त कर्मचारीही उपदान, रजा रोखीकरणाच्या लाभापासून वंचित आहेत.

राज्यातील ३८५ नगर परिषद आणि नगर पंचायतमध्ये ७० हजाराहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी आवश्यक तेवढा निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जात नाही. याचा दणका सफाई कामगार आणि इतर कर्मचाऱ्यांना बसतो. यात कर्मचाऱ्यांचेच वेतन अडविले जाते. मागील काही वर्षांपासूनची वेतनातील अनियमितता त्यांच्यापुढे अनेक अडचणी निर्माण करणाऱ्या ठरत आहे. कर्जाचे हप्ते लांबणीवर पडून व्याजाचा भुर्दंड बसतो. नियमित खर्चात अडचणी अडथळे येत आहेत.

नगर परिषद आणि नगर पंचायतमधून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही अनुदान तुटवड्याचा दणका बसला आहे. मागील आठ वर्षांपासून निवृत्त झालेल्या १२ हजार कर्मचाऱ्यांना उपदान, रजा रोखीकरणाचा लाभ मिळालेला नाही. निवृत्तांना १० ते १२ कोटी रुपये घेणे आहे. निवृत्ती वेतनही नियमित मिळत नाही. वृध्दापकाळात निर्माण होणाऱ्या व्याधींवर उपचारात यामुळे खंड पडतो. शिवाय केवळ निवृत्ती वेतनावर अवलंबून असलेल्या कर्मचाऱ्यांना दैनंदिन गरजा भागविण्यातही अडचणी येत आहेत.

वेतन आयोगाच्या फरकाची प्रतीक्षा

राज्य शासनाने इतर विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाचा पहिला हप्ता दिला. मात्र, नगर परिषद आणि नगर पंचायत कर्मचाऱ्यांना अजूनही फरकाची रक्कम मिळालेली नाही. या आयोगानुसार १०-२०-३० वर्षांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनाही या कर्मचाऱ्यांच्या पदरात पडली नाही. याशिवाय अनेक प्रश्न अधांतरी आहे.

नियमित वेतनासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. याकडे शासनाकडून दुर्लक्ष होत आहे. या बाबीच्या निषेधार्थ १ मार्च रोजी ' ढोल बजाव भीक मागो ' आंदोलन केले जाईल. यातून गोळा होणारी सर्व रक्कम शासनाला पाठविली जाणार आहे. यानंतरही प्रश्न मार्गी न लागल्यास १५ एप्रिलपासून बेमुदत काम बंद आंदोलन केले जाईल.

- विश्वनाथ घुगे, अध्यक्ष, म.रा. नगर परिषद, पंचायत कर्मचारी संघटना
 

Web Title: Retirees are also waiting for benefits for 7 years, stagnant salaries of 30,000 employees of the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.