सेवानिवृत्तांचे थकीत रकमेसाठी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:49 AM2021-09-24T04:49:19+5:302021-09-24T04:49:19+5:30
पुसद : नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेसाठी बुधवारपासून पालिकेसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. २०१६ पासून ...
पुसद : नगरपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेसाठी बुधवारपासून पालिकेसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.
२०१६ पासून देय सातव्या वेतन आयोगाच्या थकीत रकमेचा हप्ता तात्काळ द्यावा, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. शेकडो सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाची रक्कम २०१६ पासून थकीत आहे. शासन आदेशानुसार ती भविष्य निर्वाह निधी खात्यात जमा करण्याचे निर्देश आहेत. मात्र, पालिकेने अद्याप रक्कम खात्यात जमा केलेली नाही. ही रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडे केली होती. मागणी मान्य न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा दिला होता. त्यानुसार सेवानिवृत्तांनी उपोषणाला प्रारंभ केला.
नगरपरिषद प्रशासन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा करीत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे. उपोषणात अशोक उंटवाल, रामकृष्ण दिगलवार, उत्तमराव शिंदे, शेख महेबूब शेख हबीब, प्रदीप जतकर, चंद्रशेखर अंजिकर, दिलीप रायपूरकर, बलदेव चौहान, विजय नरसिंग, किसन वाळूकर, सुधाकर कंदकुरवार, नजीमोदिन रफिकोदिन, सत्येंद्र गोरे, तुळशीराम चरावंडे, प्रकाश नकवाल, तुकाराम काळे, निवास मोहेकर, विलास कान्हेड, सुभाष व्हनंडाले, विजया डांगे आदी सेवानिवृत्त सहभागी आहेत.