निवृत्त पोलिसांच्या वेतन निश्चितीचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 10:30 PM2019-01-27T22:30:24+5:302019-01-27T22:31:20+5:30
जिल्हा पोलीस दलातून २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मधील फरकाचा तिढा कायम होता. यासाठी निवृत्त कर्मचाºयांना सातत्याने कार्यालयात येरझारा माराव्या लागत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हक्काचे वेतन मिळविण्यासाठी संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा पोलीस दलातून २००६ नंतर सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या ‘ग्रेड पे’मधील फरकाचा तिढा कायम होता. यासाठी निवृत्त कर्मचाºयांना सातत्याने कार्यालयात येरझारा माराव्या लागत होत्या. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सकारात्मक भूमिकेमुळे हक्काचे वेतन मिळविण्यासाठी संघर्ष अखेर संपुष्टात आला आहे. एकावेळी २१० निवृत्त पोलीस हवालदारांचे वेतन निश्चित करून त्यांना ८० लाखांची रक्कम मंजूर झाली आहे.
निवृत्त पोलीस बाबूगिरीमुळे त्रस्त होतात. वेतनाच्या फरकाची रक्कम निश्चित करून घेण्यासाठी प्रत्येक टप्प्यावर इतरांची मर्जी सांभाळावी लागते. अनेकदा शारीरिक व्याधींमुळे अनेकांना कार्यालयात चकरा मारणे शक्य होत नाही. ही अडचण लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी राज्यात पहिल्यांदाच अभिनव उपक्रम हाती घेतला.
२००६ ते २०१८ या कालावधीत निवृत्त झालेल्या कर्मचाºयांचा ‘ग्रेड पे’ फरकाची रक्कम निश्चित करून त्याचे वाटप केले. गुरूवारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात ५२ सेवानिवृत्तांना वितरण करण्यात आले. यावेळी अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रदीप शिरसकर, पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण, सेवानिवृत्त कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गुलाब पंधरे, महासचिव देवानंद बन्सोड, चंद्रशेखर सवाने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमादार प्रकाश देशमुख यांनी केले. आभार पोलीस निरीक्षक उत्तम चव्हाण यांनी मानले.